

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील 20 ते 22 गावांत जनावरांमध्ये लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. आजवर चार जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन गाई व एका बैलाचा समावेश आहे. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील सर्व 100 टक्के जनावरांचे लसीकरण करण्याचा निर्णय बारामती तालुका सहकारी दूध संघात गुरुवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हंगाम सुरू होताना ऊस तोडणी मजुरांची जनावरे तालुक्यात येतील. त्यातून या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच्या खबरदारीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच्या उपाययोजनेची बैठक संघाच्या पुढाकाराने झाली. या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, व्यवस्थापक डॉ. सचिन ढोपे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव टेंगल, व्यवस्थापक नीलेश लोणकर, बाजार समितीचे प्रशासक मिलिंद टांकसाळे, सचिव अरविंद जगताप, बारामती लघू पशुचिकित्सालयाचे सहायक आयुक्त आर. एल. र्त्यंबके, तालुका पशुधन अधिकारी डॉ. आर. आर. पाटील आदी उपस्थित होते. तालुक्यातील सहकारी दूध संकलन केंद्रांचे प्रतिनिधी, पशुवैद्यकीय अधिकारी हेही हजर होते.
बैठकीत डॉ. र्त्यंबके यांनी तालुक्यात 1 लाख 22 हजार जनावरे असून त्यातील 1 लाख 8 हजार जनावरांना लस देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यापैकी 77 हजार 700 जनावरांना लस देण्यात आली असून 29 टक्के लसीकरण अद्याप बाकी आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार असून लवकरच 100 टक्के लसीकरण झालेले असेल, अशी ग्वाही दिली. लम्पी स्किनपासून बचावासाठी शेतकर्यांनी पशुधनाची कशी काळजी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रांताधिकारी कांबळे यांनी कारखान्यांचे हंगाम सुरू होण्यापूर्वी 100 टक्के लसीकरण आवश्यक असल्याचे सांगून दूध संघ त्यासाठी आवश्यक ती मदत करत असल्याबद्दल कौतुक केले. या काळात परराज्यातून जनावरे आणू नयेत असे आवाहन केले.
गटविकास अधिकारी बागल यांनी ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत जनजागृती, फॉगिंग आदी कामे केली जात असल्याचे सांगितले. बाळासाहेब तावरे, प्रशांत काटे यांनी लसीकरणात कोणतीही हयगय ठेवू नये, हंगाम सुरू होण्यापूर्वी 100 टक्के लसीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. होळकर यांनी तालुक्याचा आढावा घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार हे दैनंदिन आढावा घेत असल्याचे ते म्हणाले.
संदीप जगताप यांनी दूध संघामार्फत आवश्यक ती मदत करत ही साथ आटोक्यात आणण्यात सर्व घटकांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दूध संघाकडून पशुवैद्यकीय अधिकारी सेवा देत असून लस उपलब्ध करून दिली जात असल्याचे ते म्हणाले. या वेळी डॉ. रूपाली जाधव, डॉ. दीपक पवार, सतीश काकडे, तानाजी खोमणे आदींनी काही सूचना मांडल्या. उपस्थितांचे आभार दूध संघाचे व्यवस्थापक डॉ. सचिन ढोपे यांनी मानले.