ओतूर : बळिराजाच्या आनंदावर विरजण; लम्पीमुळे पोळा साजरा करण्यावर बंदी | पुढारी

ओतूर : बळिराजाच्या आनंदावर विरजण; लम्पीमुळे पोळा साजरा करण्यावर बंदी

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: पशुधनावर होत असलेल्या लम्पी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोळ्यानिमित्त बैल एकत्र आणण्यास शासनाने बंदी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे पोळा साजरा केलेला नव्हता. त्यात लम्पीमुळे पोळा साजरा होत नसल्याने शेतकरीवर्गात निरुत्साह दिसून येत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात अनेक जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे तर काही ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने अधिनियमातील अधिसूचनेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र हे नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

या अधिसूचनेद्वारे लम्पी प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर सध्या पशुधनाच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. पोळा सणानिमित्त बैल मोठ्या प्रमाणात एकत्र आणून त्यांची मिरवणूक निघण्याची शक्यता असल्याने लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
बैल एकत्र आणण्यास शासनाकडून बंदी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी याबाबत नोटीस बोर्ड व दवंडीद्वारे कळविण्याचे शासनाकडून सूचित करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात शेतीपूरक पशुपालन व्यवसायांना आता लम्पीमुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकर्‍याचा मुख्य शेतीपूरक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसायच आहे, तो सध्या अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसत आहेत. लम्पी रोगाविषयी अद्याप कोणतीही पूर्णतः माहिती नसल्याने याबाबत समाजात गैरसमज वाढतानाचे ग्रामीण भागात चित्र आहे तसेच शेतकर्‍यांच्या जनावरांना लम्पी लसीकरण अग्रक्रमाने करण्याची मागणी होत आहे.

Back to top button