

संतोष शिंदे :
पिंपरी : शेजारी राहणार्या तरुणाने बांधकाम व्यावसायिकाच्या सात वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर एमआयडीसी भोसरी येथील एका पडक्या इमारतीत मृतदेह टाकून आरोपी फरार झाले. ही घटना 9 सप्टेंबर 2022 रोजी उघडकीस आली. या घटनेनंतर 'पुढारी'ने शहरात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पायी जाताना सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढवणार्या ठिकाणांचा आढावा घेतला. त्यावेळी पोलिस रेकॉर्डवर शहर परिसरात एकूण 81 निर्जन स्थळे, 45 मोकळी मैदाने, 25 पडक्या इमारती आणि 13 टेकड्या असल्याचे समोर आले. याशिवाय शहर परिसरात आणखी काही निर्जन ठिकाणे आहेत, जेथे पोलिसांनी नियमित गस्त आवश्यक आहे.
गस्तीवरील पोलिसांचा 'वॉच' हवा
बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाचा मृतदेह टाकलेल्या पडक्या इमारतीत दारूच्या बाटल्या आणि इंजेक्शनचा खच पडल्याचे दिसून आले. त्यामुळे एमआयडीसी परिसरात मद्यपी आणि गर्दुल्ल्यांची नियमित वर्दळ असल्याचे अधोरेखित झाले आहे. गस्तीवरील पोलिसांनी अशा ठिकाणांवर 'वॉच' ठेवणे गरजेचे आहे.
एचए मैदानात फेकला होता मृतदेह
सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा मृतदेह पिंपरी येथील एचए मैदानात फेकून दिला. 27 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आई वडिलांचा देखील मृत्यू झाला. या घटनेनंतर काही दिवस मोकळ्या मैदानांवर पोलिसांनी नियमित गस्त घातली. मात्र, दरम्यानच्या काळात गस्तीचे प्रमाण कमी झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
दोन्ही आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज
हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. 27 नोव्हेंबर 2019 रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर तत्कालीन पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी एक बैठक घेतली होती. शहरातील निर्जन स्थळांवर लाईट व सीसीटीव्ही बसवण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली; मात्र, यावर पुढे कार्यवाही झाली नाही. सध्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी यामध्ये लक्ष देऊन निर्जन स्थळवरील लाईट व सीसीटीव्हीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.
पोलिस ठाणे मोकळी मैदाने निर्जन स्थळे पडीक इमारती
पिंपरी 8 12 2
चिंचवड 3 6 2
निगडी 0 3 0
भोसरी 9 9 8
एमआयडीसी भोसरी 2 6 2
चाकण 1 5 1
दिघी 3 3 0
आळंदी 2 0 0
महाळुंगे चौकी 2 5 1
वाकड 4 13 0
हिंजवडी 1 3 2
सांगवी 2 4 0
देहूरोड 0 2 0
तळेगाव दाभाडे 5 1 2
तळेगाव एमआयडीसी 1 3 1
चिखली 2 4 4
शिरगाव 0 1 0
रावेत 0 1 0
एकूण 45 81 25