

खडकी; पुढारी वृत्तसेवा: खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येत आहे. यातील काही स्टॉलधारक घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. तसेच त्यांच्याकडे परवानेदेखील दिसून येत नाही. याकडे बोर्ड प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बोर्डाच्या हद्दीमध्ये हॉटेल व काही दुकानांसमोरील जागा खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत.
संबंधित स्टॉलधारकांकडून दररोज सुमारे 200 ते 300 रुपयांप्रमाणे हॉटेलमालक व दुकानदार पैसे वसूल करीत आहेत. या स्टॉलधारक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याचे दिसून येत. मात्र, बोर्ड प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
हॉटेल, तसेच दुकानदारांकडे बोर्ड प्रशासनाचे परवाने आहेत. मात्र, भाडेतत्त्वावर देण्यात आलेले स्टॉलधारकांकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नाहीत.
चहा, वडापाव, जिलेबी, चायनीज खाद्यपदार्थ, इडली सांबर, पानपट्टी, तसेच ज्यूसचे स्टॉल भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. संबंधित दुकानदारांचे अधिकार्यांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई करीत होत नाही. तसेच प्रशासनाने सर्व अनधिकृत स्टॉलधारकांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हॉटेल व दुकानांसमोर लावण्यात येणार्या अनधिकृत खाद्य पदार्थ स्टॉलधारकांची लवकरच तपासणी करण्यात येणार आहेत. संबंधित स्टॉलधारकांकडून परवान्याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
शिरीष पत्की, आरोग्य अधीक्षक