चाकण : फर्निचरच्या गोदामांना भीषण आग; 25 लाखांपेक्षा अधिक नुकसान | पुढारी

चाकण : फर्निचरच्या गोदामांना भीषण आग; 25 लाखांपेक्षा अधिक नुकसान

चाकण; पुढारी वृत्तसेवा: चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील रासे (ता. खेड) हद्दीतील दोन फर्निचरच्या गोदामांना बुधवारी (दि. 21) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुमारे 25 लाखांहून अधिक वित्तहानी झाली. आगीचे नेमके कारण अद्याप निष्पन्न झाले नाही.

रासे फाटा येथे रस्त्यावरच फर्निचरची शेजारी-शेजारीच काही गोदामे आहेत. बुधवारी मध्यरात्री अचानक यातील एका गोदामाला भीषण आग लागली. आगीचे तांडव भयानक असल्याने रात्री आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य नव्हते. याबाबतची माहिती पोलिसांना कळविताच चाकण पोलिस व चाकण अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत आणखी एका गोदामात आगीचा तांडव सुरू झाला. दोन्ही गोदामातील संपूर्ण फर्निचर, यासाठीचा कच्चा माल, तयार माल व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.

यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा प्रचंड मारा करून आग नियंत्रणात आणली. गुरुवारी (दि. 22) सकाळी नऊच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या आगीत जीवितहानी टळली आहे. लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीत दोन्ही गोदामांचे आणि एका दुचाकी वाहनाचेदेखील जळून नुकसान झाले आहे.

Back to top button