पुणे : 272 टेरिस हॉटेलला महापालिकेचा दणका | पुढारी

पुणे : 272 टेरिस हॉटेलला महापालिकेचा दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: इमारतींच्या टेरेसवर आणि फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमध्ये अनधिकृतपणे चालवल्या जाणार्‍या 272 हॉटेल व रेस्टॉरंटवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. या मिळकतींना तीनपट कर आकारून दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली. तसेच थकबाकीदार 1355 मिळकती सील करून 92 कोटी थकबाकी वसूल केल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

बाणेर येथील एका इमारतीच्या टेरेसवरील (रुफ टॉप हॉटेल) रेस्टॉरंटला आग लागली होती, सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर असलेल्या रेस्टॉरंटच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून मिळकतकर विभागाच्या पेठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील रुफ टॉप हॉटेलसह फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील हॉटेलवर कारवाई करा. त्यांना तीनपट कर लावून तो वसूल करण्याचे आदेश दिले होते.

Back to top button