पाटस : रस्ता रुंदीकरणासाठी पोलिस बंदोबस्तात ग्रामस्थांची घरे पाडली | पुढारी

पाटस : रस्ता रुंदीकरणासाठी पोलिस बंदोबस्तात ग्रामस्थांची घरे पाडली

पाटस; पुढारी वृतसेवा: रोटी गावातून जाणार्‍या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील रुंदीकरण कामात येणार्‍या ग्रामस्थांची घरे पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी ठेकेदाराला घेराव घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रोटी येथे बुधवार (दि. 21) पासून पोलिस बंदोबस्तात घरे पडण्यास सुरुवात करण्यात आली. गावातील मुख्य चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असताना रस्ता रुंदीकारणाच्या कामासाठी काही ग्रामस्थांची घरे जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने पाडण्यात आली आहेत. या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रोटी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांचा महामार्गाच्या कामाला विरोध नसल्याचे स्पष्ट दिसत आहे; मात्र काही ग्रामस्थांना आपल्या घराच्या व जागेच्या रक्कमा काहींना कमी तर काहींना जास्त मिळाल्या आहेत तर काही ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी ते ग्रामस्थ मागणी करत आहेत. या नागरिकांना घरे पडण्याची पूर्वकल्पना व कसलीच कायदेशीर नोटीस न देता घरे पाडण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. या वेळी रस्ता महामार्गाचे संबंधित अधिकारी व ठेकेदार, पाटस चौकीचे कर्मचारी, महसूल विभागाच्या पाटस मंडल अधिकारी एस. एन. गायकवाड, रोटीचे तलाठी रोहन गबाले व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Back to top button