नवरात्रीत एसटीने जा साडेतीन पीठांच्या दर्शनाला; फक्त २ हजार ६९५ रुपयांत प्रवास

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एसटीच्या पुणे विभागाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी आगाऊ आरक्षण सुविधा सुध्दा सुरू करण्यात आली आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक 27 व 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता पिंपरी चिंचवड येथून पिंपरी चिंचवड, शिवाजीनर, स्वारगेट, कात्रज, कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्तश्रुंगी मार्गे पुन्हा पिंपरी चिंचवड अशी एसटी बस सोडण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांना 2 हजार 695 रुपये तिकीट दर आकारण्यात येणार असून, यावेळी तुळजापूर, माहुरगड आणि सप्तश्रुंगीगड येथे मुक्काम असणार आहे.
तसेच, पुण्यातील शिवाजीनगर येथून 30 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज, कोल्हापूर, तुळजापूर, माहुरगड, सप्तश्रुंगी मार्गे पुन्हा शिवाजीनगर अशी एसटी बस सोडण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 645 रुपये तिकीट दर असणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी राहणे, जेवण आणि इतर खर्च स्वतः प्रवाशांना करावा लागणार आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.