वाहने पार्क करून गायब होणार्यांवर कारवाई, लोणावळा मुख्याधिकारी पंडित पाटील यांचा इशारा

लोणावळा : लोणावळा नगर परिषद कार्यालयाच्या पार्किंग एरियामध्ये आपली वाहने उभी करून गायब होणार्यांच्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिला आहे.
लोणावळा नगर परिषदेमध्ये कोणतेही काम नसताना अनेकजण नगर परिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या पार्किंगमध्ये आपली चारचाकी तसेच दुचाकी वाहनं उभी करून तासंतास गायब होतात. अनेकजण तर येथील पार्किंग ही आपली पर्मनंट पार्किंग असल्या सारखी दिवस आणि रात्र येथे वाहन लावून ठेवत असतात.
काहीजण सकाळी गाडी लावतात ते थेट रात्री गाडी बाहेर काढतात, तर काहीजण रात्री याठिकाणी गाडी पार्क करून जातात आणि थेट दुसर्या दिवशी गाडी येथून बाहेर काढतात. त्यामुळे अनेकदा नगर परिषद अधिकारीवर्ग, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नगर परिषदेमध्ये काही कामानिमित्त येणार्या लोकांना आपली वाहनं पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात.
मुख्याधिकारी यांनी नगर परिषद कार्यालयातील सुरक्षा रक्षकांना याबाबत विचारणा केली असता अनेकजण दादागिरी करून, दमदाटी करून तसेच भांडून जबरदस्ती याठिकाणी गाडी लावून जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे आता स्वतः मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी यावर कडक निर्णय घेण्याचं ठरवलं असून अशा गाड्यांवर कारवाई करीत ही वाहनं जप्त करण्याचा तसेच नगर परिषद तसेच पोलिसांद्वारे दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.