पुणे : सोळा गुन्हे दाखल असलेल्या सराईत घरफोड्याला बेड्या, गुन्हे शाखेच्या युनिट 3 ची कारवाई | पुढारी

पुणे : सोळा गुन्हे दाखल असलेल्या सराईत घरफोड्याला बेड्या, गुन्हे शाखेच्या युनिट 3 ची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात विविध ठिकाणी आपल्या शिकलगरी साथीदाराच्या मदतीने घरफोडी करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने पाठलाग करून बेड्या ठोकल्या. त्याचा साथीदार यावेळी पळून जाण्यास यशस्वी ठरला. त्याच्याकडून तब्बल 10 लाख 5 हजारांचा 180 ग्रॅम सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. युवराज वसंत मोहिते (34, रा. मु. पो. तोंडोली, ता. कडेगाव जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या वरिष्ठ निरीक्षक अनिता मोरे या समांतर तपास करत असताना संशयीत आरोपी कोथरूड येथील डुक्करखिंड येथे येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी संतोष क्षिरसागर आणि ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला.

दोन्ही आरोपी हे दुचाकीवरून डुक्कर खिंडीकडून महात्मा सोसायटीच्या दिशेने येत असताना दुचाकीवर मागे बसलेला सराईत शिकलकरी आरोपीने गाडीवरून उडी मारून टेकडीच्या दिशेने पळत असताना कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, तो टेकडीवरील झाडीत पळून गेला. त्यावेळी दुचाकीवरील त्याचा सथीदार मोहिते हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून तब्बल 180 ग्रॅम सोन्याचे दागिने, 172 ग्रॅम चांदीचे दागिने, दोन दुचाकी असा 10 लाख 5 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात कोथरूड येथील तीन, सिंहगडरोड पोलिस ठाणे, अलंकार पोलिस ठाणे, दत्तवाडी आणि खेड पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर पंढरपूर पोलिस ठाण्यातील दुचाकी चोरीचाही एक गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अमंलदार राजेंद्र मारणे, शरद वाकसे, राकेश टेकवडे, रामदास गोणते, दिपक क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेला सराईत आरोपी युवराज मोहिते याच्यावर चोरी आणि घरफोडीचे 16 गुन्हे दाखल आहे. तसेच त्याच्यावर खुनाचा देखील गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून 10 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याचा साथीदार हा पुण्यातील असून त्याचा देखील शोध सुरू आहे.
                              – अनिता मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, युनिट 3, गुन्हे शाखा.

Back to top button