एनआयए चे ४ ठिकाणी छापे, कोंढव्यातून दोन जण ताब्यात ! | पुढारी

एनआयए चे ४ ठिकाणी छापे, कोंढव्यातून दोन जण ताब्यात !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘फॅमिली खर्च तरतूद’ या नावाखाली कुवेत, कतार, बहरीन व सोदी अरेबियातील पॉप्युलर फ्रंट संघटनेकडे आलेल्या रकमेचा वापर दहशतवादी कारवाईसाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या कार्यालयावर गुरुवारी पहाटे एनआयए, इडी व एटीएसच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. या कारवाईत पुण्यातील संघटनेचा नेता रझी यासह आणखी एक, असे दोन जण ताब्यात घेण्यात आले आहेत. पथकाकडून आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे टाकण्यात आलेल्या छाप्यात कार्यालयातून संगणक, हार्डडिस्क व काही रक्कमेच्या हिशोबाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. कारवाईनंतर स्थानिक नेत्यांनी कारवाई विरोधात नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदवला. स्थानिक पोलिसांना कारवाई होताना माहिती मिळाल्यावर त्यांनी शहानिशा करूनही गप्प राहणे पसंत केले.

सीआरपीएफ जवानांच्या अत्यंत कडेकोट बंदोबस्तातील वाहनासह कार मधून आलेल्या अधिकाऱ्यांनी एकास ताब्यात घेत मोर्चा दुसरीकडे वळवला. दरम्यान, पुणे एटीएस पथकाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, राज्याचे एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, राज्यात नांदेड, औरंगाबाद, मालेगाव, पुणेसह इतर ठिकाणी छापे सुरू आहेत. एएनआय, ईडी व एटीएस यांची संयुक्त कारवाई असून, सविस्तर माहिती नंतर देण्यात येणार आहे.

Back to top button