नको तेथे डांबरीकरण! सूस येथे मानवी वस्ती असलेल्या भागातील रस्त्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष | पुढारी

नको तेथे डांबरीकरण! सूस येथे मानवी वस्ती असलेल्या भागातील रस्त्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: बाणेर, बालेवाडी, औंध, सूस परिसरातील अनेक रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. परंतु सूसमध्ये मानवी वस्ती नसलेल्या भागात प्रशासनाद्वारे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यामुळे नको त्या ठिकाणी डांबरीकरण व पाहिजे तेथे काहीच नाही, असे चित्र दिसून येत आहे.

सूस परिसरातील महादेवनगर येथील नागरिक वारंवार रस्त्याचे काम करून देण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहेत, परंतु, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकार्‍यांनी निधी नसल्याचे सांगत आहेत. मात्र, काही अधिकार्‍यांकडून कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी विबग्योर शाळेपासून पुढे सनी वर्ल्डकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम केले जात आहे. वास्तविक पाहता या भागात फारशी लोकवस्ती नसतानासुद्धा हे काम करण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रशासनाने या रस्त्याचे डांबरीकरण करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी. टेंडर न काढता करण्यात आलेल्या डांबरीकरणाचे पैसे संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल करण्यात यावेत. या संदर्भात कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल.

                                   -रविराज काळे, जिल्हाध्यक्ष, भारतीय मराठा महासंघ

संबंधित प्रकाराची माहिती घेऊन पाहणी करून कारवाई केली जाईल. असा प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. दाट लोकवस्ती असलेल्या भागातील कामांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

                                               -नितीन उदास, उपायुक्त, महापालिका

 

Back to top button