भांडगावच्या अनधिकृत प्लॉटिंगला दणका; जमीनमालकाला नोटीस

भांडगावच्या अनधिकृत प्लॉटिंगला तहसीलदार संजय पाटील यांनी दणका दिला.
भांडगावच्या अनधिकृत प्लॉटिंगला तहसीलदार संजय पाटील यांनी दणका दिला.

खोर; पुढारी वृत्तसेवा: भांडगाव येथे बेकायदेशीरपणे शासनाच्या कसलीही परवानगी न घेता गुंठेवारी करणार्‍यांना दौंडच्या तहसीलदारांनी दणका दिला. 'शर्त भंग' केल्या प्रकरणी जमीन सरकार जमा का करण्यात येवू नये याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करावा अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे.

भांडगावमधील गुंठेवारीच्या गोरख धंद्याबाबत अनेक चर्चा सध्या सुरु असून भांडगावचे तलाठी अर्जुन स्वामी यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पंचनामा करत याबाबतचा अहवाल दौंड तहसीलदार यांना सादर केला होता. पंचनाम्यावेळी भांडगाव येथील गट नं. 363 हे अरविंद गुलाबचंद सोलंकी यांच्या नावे असून या जमीनीमध्ये कोणत्याही प्रकारची अकृषिक परवानगी न घेता बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून त्याची जाहिरात करून विक्री करत असल्याचे दिसून आले होते.

तसेच या जमिनीमध्ये मोठ्या उंचीची कमान व इतर स्वरूपाचे बांधकाम केलेले आहे. त्याचप्रमाणे उत्तरेस रस्ता ठेवलेला असून रस्त्याचे पश्चिमेस छोट्या-मोठ्या आकाराचे प्लॉट पाडून विक्री करण्याची जाहिरात करत असल्याचे आढळून आले. त्या अनुशंगाने दौंडचे तहसीलदार यांनी संबंधित जमीन मालकाला नोटीस बजावली आहे.

याप्रकरणी अकृषिक वापराची परवानगी घेणे अपेक्षित असताना अकृषिक परवानगी घेतली असल्याचे दिसून येत नाही. यात शर्तभंग केला असल्याचे दिसून येत आहे. तरी सदर जमीन सरकारजमा का करण्यात येवू नये, याचा खुलासा तत्काळ करावा अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news