लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बारामतीत पोळ्यावर निर्बंध | पुढारी

लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बारामतीत पोळ्यावर निर्बंध

बारामती; पुढारी वृत्तसेवा: जनावरांमध्ये लम्पी आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने रविवारी (दि. 25) साजर्‍या होणार्‍या यंदाच्या भाद्रपदी पोळा सणावर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी चर्मरोगाच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी जनावरांचा बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे यावर बंदी घातली असल्याने यंदा मिरवणुका काढण्यावर निर्बंध येणार आहेत.

बारामती तालुक्यातील बहुतांश गावांत भाद्रपदी पोळा साजरा केला होता. या अनुषंगाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामतीच्या तहसीलदारांना पत्र देत यासंबंधी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सूचित केले आहे. पोळा सणादिवशी जनावरांच्या एकत्रित मिरवणुका निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंबंधी ग्रामपंचायतींनी नोटीस

बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी देत पशुपालकांपर्यंत शासनाच्या सूचना पोहोचवाव्यात. शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन ग्रामपंचायती, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस
पाटील यांनी करावे, असेही पत्रात म्हटले आहे.

Back to top button