यावेळी कोणतीही तडजोड नाही, कार्यकर्त्यांनी किंतु न बाळगता कामाला लागावे : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन | पुढारी

यावेळी कोणतीही तडजोड नाही, कार्यकर्त्यांनी किंतु न बाळगता कामाला लागावे : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत केंद्रातून काही तरी जडजोड होते, या विचारातून कार्यकर्ते काम करत नाहीत. मात्र यावेळी केंद्रातून कोणतीही तडजोड होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही विचार न करता कामाला लागावे, अशा सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्या. देशातील ज्या १४४ लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार नाहीत त्या मतदार संघात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबविली जात आहे. यासाठी लोकसभा मतदार संघप्रभारींची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी म्हणून भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती केली आहे.

त्यानुसार सितारामन या तीन दिवसीय बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्याची सुरूवात सितारामन यांनी गुरुवारी खडकवासला विधानसभा मतदार संघातून केली. धायरी‌ येथील मुक्ताई गार्डन येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री व बारामती मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, कांचन कुल, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामटे आदी उपस्थित होते.

सितारामन म्हणाल्या, अमेठी लोकसभा मतदार संघात जर बदल होऊ शकतो, भाजपला विजय मिळू शकतो तर मग बारामतीमध्येही आपणास विजय मिळू शकतो. कार्यकर्त्यांनी बोगस मतदान थांबवण्यासोबतच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा, असेही त्या म्हणाल्या. केंद्रातील नेते बारामतीला येऊन बारामती विकास मॉडेलचे गुणगाण गातात, त्यामुळे कार्यकर्त्यांना काम करताना अडचणी निर्माण होतात, असे मत आ. राहुल कुल यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित बातम्या
Back to top button