

पुणे; पुढारी वृत्तसेवा: धार्मिक कारणास्तव दोन जागेच्या बदल्यात बेकायदा विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) लाटण्यासाठी बनावट दस्त तयार करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक करणार्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळला.
मुन्नूलाल ऊर्फ राजूभाई दारूवाले (वय 65, रा. रविवार पेठ) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात फसवणूक, कागदपत्रांचे बनावटीकरण आदी कलमांनुसार पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खुसरो खान सरफराज खान (वय 50, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 जुलै 2019 पासून गुन्हा दाखल करेपर्यंत वक्फ मंडळाच्या औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात घडला.
वक्फ मंडळाने चिंचवड येथील रहिवाशाला बेकायदा होर्डिंग करारनामा केला म्हणून नोटीस बजावली होती. आरोपी दारूवाले याने नोटिशीतील जावक क्रमांकाचा वापर करून बनावट दस्त तयार करत त्यामध्ये या आदेशाला स्थगिती दिल्याचा मजकूर टाकला. त्यानंतर हे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेत सादर करून गैरमार्गाने टीडीआर उचलण्याचा प्रयत्न करून वक्फ मंडळाची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात दारूवाले याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्याला सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला.