महाराष्ट्र, कर्नाटकात घरफोड्या करणारा जेरबंद | पुढारी

महाराष्ट्र, कर्नाटकात घरफोड्या करणारा जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे, सातारा, सांगलीसह कर्नाटकात शंभराहून अधिक घरफोडीचे गुन्हे केलेल्या अट्टल घरफोड्याला पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी सांगली येथून अटक केली. लोकेश रावसाहेब सुतार (28, रा. ता. मिरज, सांगली) असे या सराईताचे नाव आहे.
त्याने चारचाकीमधून येऊन बिबवेवाडीत घरफोडी केली होती. त्याच्याकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकेश दिवसा घरफोडी करण्यात तरबेज असल्याचे पोलिसांनी सांगितले.

9 सप्टेंबर रोजी बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तन्मय सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावरील प्लॅटमधून सहा तोळे दागिने चोरी गेल्याची घटना घडली होती. याबाबत बिबवेवाडी पोलिस आरोपीच्या मागावर होते. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सुमारे 90 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीच्या गाडीचा नंबर प्राप्त केला. त्यावरून त्याचा माग काढला असता आरोपी हा सांगली जिल्ह्यातील असल्याचे समोर आले.

त्यानुसार तपास पथकाने आरोपीला सांगलीमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्यावर सातारा, सांगलीसह कर्नाटक राज्यात तब्बल शंभराहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील तीन लाख रुपये किमतीचे सहा तोळे दागिने, चोरी करण्यासाठी वापरलेली कार असा तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, कर्मचारी अभिषेक दुधाळ, तानाजी सागर, शिवाजी येवले, सतीश मोरे यांच्यासह संतोष जाधव, अतुल महांगडे, प्रणव पाटील, पंचशिला गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Back to top button