खेडच्या विकासकामांना खीळ, हा आढळरावांचा एककलमी कार्यक्रम: आ. दिलीप मोहिते पाटील

खेडच्या विकासकामांना खीळ, हा आढळरावांचा एककलमी कार्यक्रम: आ. दिलीप मोहिते पाटील
Published on
Updated on

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या माजी खासदारांना खेड तालुक्यातील जनतेने मागील तीनही लोकसभा निवडणुकांत भरभरून मतदानरूपी आशीर्वाद दिला. परंतु, खेड तालुक्याचा विकास व्हावा, अशी त्यांची सद्भावना कधीच नव्हती. म्हणूनच, खेड तालुक्यातील जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखविला. त्याच द्वेषभावनेतून उद्विग्न होऊन तालुक्यातील विकासकामांना खीळ घालण्याचा कार्यक्रम काही असंतुष्ट लोकांना बरोबर घेऊन माजी खासदार करीत आहेत, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उपनेते व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.

तसे पत्र मोहिते पाटील यांनी बुधवारी (दि. 21) प्रसिद्धीस दिले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केले आहे. तर, आढळराव पाटील यांच्या निवडक समर्थकांनी या पत्रावर आपल्या प्रतिक्रिया व्हायरल केल्या असल्याने राजकीय श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समर्थकांमध्ये जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांनी प्रस्तावित आणि भूमिपूजन केलेल्या खेड पंचायत समितीच्या इमारतीचा विषय बदलून त्याजागी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत करण्यासाठी आमदार मोहिते यांनी आग्रह धरला होता. या ठिकाणी माझे वैयक्तिक कार्यालय होणार नाही, तर तिथे तालुक्यातील सर्व महत्त्वाची कार्यालये एकत्र होणार आहेत. अशी वस्तुस्थिती असताना फक्त विरोधाला विरोध म्हणून माजी खासदार व इतरांनी प्रशासकीय इमारत होऊ न देण्यासाठी त्याविरोधात रचलेला हा एक कट आहे, असा गंभीर आरोप मोहिते पाटील यांनी केला आहे.

मोहिते पाटील म्हणतात की, खेड तालुका विकासापासून वंचित राहावा, हेच माजी खासदारांचे एकमेव ध्येय आहे का? तालुक्यात होणार्‍या विमानतळ, एसईझेड, एमआयडीसी या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना माजी खासदाराने कायमच विरोध केला आहे. खेड तालुक्यातील जनतेचा पुनर्वसनाचा प्रश्न, कळमोडी, चासकमान, भामा-आसखेड प्रकल्पातील पळविलेल्या पाण्याचा प्रश्न, एसईझेडमध्ये गेलेल्या जमिनीवरील शिक्क्यांचा प्रश्न, यावर आश्वासनाशिवाय काहीच केले नाही.

आंबेगावमध्ये प्रकल्प झाले. त्याला त्यांनी कधीही विरोध केला नाही. मात्र, खेड तालुक्यात विरोध करायचा, हे दुटप्पी धोरण वैफल्यग्रस्त व निराश माजी खासदारांनी अवलंबिलेले आहे. खेड तालुक्यातील शिवसेनेच्या जोरावर ते तीन वेळा खासदार झाले. त्यातील मूळचे किती शिवसैनिक त्यांच्याबरोबर आहेत? आता त्यांच्याबरोबर असलेले जे लोक आहेत, ते मूळचे शिवसैनिक नाहीत. माजी आमदार गोरे कुटुंबीय त्यांच्यासोबत नाहीत. कारण, विधानसभेची उमेदवारी कशी दिली? याची गोरे कुटुंबीयांना चांगलीच कल्पना असल्याचे आ. मोहिते पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news