बावधन : 33 तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

बावधन : 33 तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

बावधन; पुढारी वृत्तसेवा: अंबडवेट (ता. मुळशी) येथे चोरट्यानी कुलूपबंद घर फोडून तब्बल 33 तोळे सोने व 35 – 40 हजारांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री भरे पुलाजवळील भूमकर वस्तीत घडली. याबाबत पद्मा हनुमंत भूमकर (वय 53 वर्षे) यांनी फिर्याद दिली असून, पौड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबडवेट, ता. मुळशी हद्दीतील भरे पुलाजवळील भूमकर वस्तीत राहणार्‍या हनुमंत भूमकर हे दीपावली व भाऊबिजेनिमित्त सहकुटुंब परगावी गेले होते.

कुलूपबंद असलेल्या घरावर पाळत ठेवणार्‍या चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 33 तोळे सोन्याचे दागिने ज्यात झुबे, गळ्यातील चोकर, बांगड्या मोहनमाळ, मंगळसूत्र, राणीहार, चार अंगठ्या, 2 चैन असा सुमारे 11 लाख 30 हजारांचा ऐवज तसेच 35 -40 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादीचे पती हे निवृत्त शिक्षक असून, चोरीची बाब समजताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. घरातील बाकी इतर कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. शिवाय एक नकली दागिना तसाच बेडवर ठेवून चोर पसार झाले. सहायक पोलिस निरीक्षक पवन चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

मुळशीत चोरटे झाले उदंड!
मुळशीत दिवसेंदिवस चोर्‍यांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. या चोर्‍यांमध्ये भुरट्या चोर्‍या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पोलिसांनी नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहनही गाडी फिरवून दवंडीद्वारे केले आहे.

चोरट्यांच्या टार्गेटवर कुलूपबंद घरे
मागील 2-4 महिन्यांपासून चोरांचे मुळशीत चांगलेच फावले आहे. पोलिसांच्या गाड्या गस्तीला फिरत असूनही चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अनेक चोर्‍या करण्यात यशस्वी ठरत आहेत, तर जेवढ्या काही चोर्‍या होत आहेत, त्यामध्ये कुलूपबंद घरेच चोरांकडून फोडली जात असून अशा घरांवर आधी पाळत ठेवून ती हेरली जात असल्याचा संशय येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news