महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यात मागील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे चांडोली खुर्द येथे 50, लौकी येथे सरासरी 85 हेक्टर व चांडोली बुद्रुक येथे 116 हेक्टर शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. यासह शेतकर्यांची घरेदेखील पावसाने पडली. प्रामुख्याने भाजीपाला व चारापिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून, पंचनाम्यांना सुरुवात केली आहे.
लौकी, चांडोली बुद्रुक परिसरात ढगफुटीसदृश पावसाने शेताचे बांध फुटले. डोंगरभाग तसेच राणूबाई मंदिर परिसरात भाजीपाल्यांसह तरकारी पिकांचे नुकसान झाले होते. पिके आठ दिवसांपासून पाण्यात होती. शेती उपळली असून, लागवड केलेले बटाटा बियाणे सडू लागले आहे. ऊसपिके जमीनदोस्त झाली आहेत. काही शेतकर्यांचे टोमॅटो, भोपळा तसेच कारल्याचे मांडवच कोसळून पडले आहेत. लौकी येथे 150 ते चांडोली बुद्रुक येथे 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या पिकांना पावसाने तडाखा दिल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. कांदा चाळीत साठविलेला कांदा पाऊस व उकाड्यामुळे खराब झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच एकता थोरात व ग्रामस्थ यांनी केली होती.
त्यानुसार कृषी विभागाने लौकी व चांडोली बुद्रुक परिसरात पंचनामे सुरू केले आहेत. तसे अर्ज शेतकर्यांकडून भरून घेतले आहेत. कृषी
पर्यवेक्षक संजय बिराजदार, कृषी सहायक दीपाली धिमते यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून शेतकर्याशी संवाद साधला. या वेळी राजाराम थोरात, सुभाष थोरात, गजानन थोरात, शंकर थोरात, बाळशिराम थोरात, विनोद थोरात, कांतीलाल थोरात आदी उपस्थित होते.