कुटुंबसत्ताकांवर आघातासाठी भाजपकडून बारामतीची निवड

कुटुंबसत्ताकांवर आघातासाठी भाजपकडून बारामतीची निवड
Published on
Updated on

सुहास जगताप
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर खरे आव्हान प्रादेशिक पक्षांचे राहणार असून, यातील एखादा अपवाद वगळता बहुतेक सर्व पक्ष कुटुंबसत्ताक आहेत. त्यामुळे या पक्षांना धक्का देण्याच्या राष्ट्रीय धोरणानुसार महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक कुटुंबसत्ताक पक्षाला जोरदार धक्क देण्यासाठी भाजपने पवारांच्या बारामतीला 'टार्गेट' केले आहे. यासाठीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दि. 22 पासूनच्या बारामती दौर्‍याची आखणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बारामतीचे पवार घराणे. या घराण्यावरच हल्लाबोल केल्यास प्रादेशिक कुटुंबसत्ताक पक्षांना नामोहरम करण्याच्या डावपेचाला गती मिळेल. बारामतीतील प्रत्येक कृतीला मोठी प्रसिध्दी मिळून राज्यभर त्याचे पडसाद उमटतील आणि कार्येकर्ते संभ्रमात पडतील, अशी खेळी बारामतीची निवड करताना भाजपने खेळली आहे. प्रादेशिक पक्षातील घराणेशाही आणि त्याआधारे होणारा भ्रष्टाचार, यावर भाजपचा भर आहे, त्यामुळेच अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांच्या जलसंपदा घोटाळ्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. रोहित पवार यांच्याबद्दल मोहित कंबोज यांचे टि्वट आले.

बारामती लोकसभा मतदारसंघावर असलेले पवार घराण्याचे एकछत्री वर्चस्व खिळखिळे करण्यात मागील दोन निवडणुकांत भाजप यशस्वी ठरले आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या महादेव जानकर यांना एकूण झालेल्या मतदानाच्या 40 टक्के मते मिळली होती, तर त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर लढलेल्या कांचन कुल यांना 41 टक्के मते मिळाली होती.

यापूर्वी कोणत्याही लोकसभा निवडणुकीत भाजपला बारामती मतदारसंघात एवढे यश मिळाले नव्हते. या मतदारसंघात भाजप फक्त लुटुपुटूची लढाई लढत असे. या यशानंतरच भाजपने आता 'ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती' हा नारा देत अमेठीत गेल्या वेळी राहुल गांधींचा पराभव केला. या वेळी आता बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करू, अशी घोषणा करीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरण्याचे ठरविले आहे.

मतदारसंघात खडकवासलामध्ये भीमराव तापकीर आणि दौंडमध्ये राहुल कुल, असे दोन आमदार भाजपचे आहेत; तर पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिंदे गटाची मोठी ताकद भाजपला मिळणार आहे. इंदापूरमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये असलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बळ सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी होते.

आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजपला या वेळी इंदापूरमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे. भोर मतदारसंघात रमेश कोंडे शिंदे गटात असल्याने भाजपला बळ मिळेल. खुद्द पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी सुप्रिया सुळे यांना 1 लाख
25 हजारांचे विक्रमी मताधिक्य मिळाले होते, ते कमीत कमी करण्यावर भाजपने लक्ष दिले आहे.

गेल्या निवडणुकीनंतर भाजपने बारामतीवर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे कार्यालयही बारामती शहरात उघडले आहे. धनगर समाजाचे एकंदरीतच बारामती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील प्राबल्य असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांना बारामतीकडे लक्ष देण्यास भाजप नेत्यांनी सांगितल्याने त्यांनी चांगले संघटन तयार केले आहे. तर आता बारामतीच्या प्रभारीपदी धनगर समाजाचे आमदार राम शिंदे यांची नियुक्ती केली आहे. बारामतीतील प्रत्येक निवडणूक गंभीरपणे लढविण्यास भाजपने सुरुवात केली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे दिसून आले. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातच आता संघटन वाढविण्यास भाजपने सुरुवात केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news