

श्रीकांत बोरावके
आळंदी : आळंदी नगरपरिषदेची हद्दवाढ करीत लगतच्या आठ गावांचा आळंदी नगरपरिषदेत समावेश करण्याच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला समाविष्ट होणार्या गावांनी मात्र कडाडून विरोध दर्शविला आहे. तसा प्रस्ताव ग्रामसभेपुढे आल्यास तो धुडकावून लावू, अशी भूमिका आठही ग्रामपंचायतींनी घेतली आहे.आळंदी शहरात समावेश होऊन गावचा विकास होईल, अशी जरी प्रशासनाची भूमिका
असली; तरी प्रत्यक्षात मात्र आळंदी शहराचा इतक्या वर्षांत म्हणावा तसा विकास झाला नसल्याने लगतच्या गावांची शहरात सहभागी होण्याची भूमिका नसल्याचे दिसून येत आहे. केवळ उत्पन्नवाढीसाठी आम्हाला नगरपरिषद लादली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय सहभागी झाल्यानंतर शेतीविकास आणि इतर विकासकामांवर आरक्षण मर्यादा येणार असल्याने तूर्तासतरी सर्वच गावे पालिकेत सहभागी होण्यास निरुत्साही दिसून येत आहेत.
दरम्यान, आळंदीलगतच्या आठ गावांचा आळंदी नगरपरिषदेमध्ये समावेश करून आळंदी शहराच्या हद्दवाढीचा निर्णय झाला आहे. पालिकेवर तहसीलदार वैशाली वाघमारे यांची प्रशासक म्हणून नेमणूक असून, त्यांनी 27 नंबरच्या ठरावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबत हद्दवाढ केली जावी, अशी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कड यांची मागणी होती. या ठरावात केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ, गोलेगाव, पिंपळगाव, चर्होली खुर्द आणि आळंदी ग्रामीण अशा आठ गावांचा आळंदी शहर हद्दवाढीत समावेश आहे. पिंपरी महापालिका असल्याने तिथे हद्दवाढ न करता खेड तालुक्यातीलच आठ गावे नगरपरिषदेत सहभागी केली आहेत. हद्दवाढीमुळे नगरपरिषदेचे क्षेत्रफळ वाढणार असून, वारकरी सुविधा पुरवताना रखडलेला एसटीपी प्लांट मार्गी लावण्यात हद्दवाढीचा उपयोग होणार आहे.
आळंदी नगरपरिषद हद्दवाढ ठरावात एकूण समाविष्ट ग्रामपंचायती 6, तर महसुली गावे 8 आहेत. सध्या 'क' वर्ग असलेली आळंदी नगरपरिषद हद्दवाढीनंतर पुणे जिल्ह्यातील क्रमांक 3 ची 'अ' वर्ग नगरपरिषद असेल. अंदाजे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या हद्दवाढ क्षेत्रात समाविष्ट आहे.