पुरंदर तालुक्यामध्ये लम्पीग्रस्त 28 जनावरे | पुढारी

पुरंदर तालुक्यामध्ये लम्पीग्रस्त 28 जनावरे

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यामध्ये सासवड येथील इनामके मळ्यात लम्पीचे पहिले जनावर मागील काही दिवसांपूर्वी आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने त्वरित इनामके मळ्यापासून पाच किलोमीटर कार्यक्षेत्रामध्ये लसीकरणात सुरुवात केली होती. पुरंदर तालुक्यांमध्ये सद्यःस्थितीत एकूण 28 जनावरे लम्पी आजाराचे ग्रस्त आहेत. यातील 5 जनावरे बरी झाली असून, तालुक्यामध्ये आजअखेर 10 हजर 270 जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकीय विभागामार्फत पूर्ण झाले आहे. इनामके मळा, पांगारे, भिवरी या तीन एलएसडी ईपीसेंटरमध्ये 8 हजार 537 लसीकरण पूर्ण करण्यात आले असून, प्रशासनाकडून पुरंदर तालुक्यासाठी 9 हजार लशींचा पुरवठा करण्यात आला होता.

परंतु, तालुक्यातील विविध ठिकाणी लम्पीग्रस्त जनावरे आढळत असल्याने प्रशासनाकडे अजून लशींची मागणी केली आहे. तालुक्यातील सासवडनजीक असलेल्या इनामके मळ्याच्या पाच किलोमीटर क्षेत्रामध्ये 6 हजार 137 गाईवर्गीय जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. तर, भिवरीमध्ये 1 हजार 200 व पांगारे येथे 1 हजार 200 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रशासनाकडे पुरंदर तालुक्यातील भिवरी, पांगारे, जवळार्जुन, माळशिरस त्यासोबतच पुढे उद्भभणार्‍या गावांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 12 हजार लशींची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

तालुक्यात लशींचा तुटवडा
पुरंदर तालुक्यामध्ये लम्पी रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असताना प्रशासनाकडून लशींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जात नाही. प्रशासनाने लक्ष देऊन पुरंदरमध्ये लशींचा पुरवठा करण्याची मागणी पशुपालक करीत आहेत.

म्हैसवर्गीय रुग्ण नाही
महाराष्ट्रातील कोणत्याही लॅबमध्ये अद्याप एकही म्हैसवर्गीय लम्पी आजाराचा रुग्ण आढळून आला नाही. फक्त गाई वर्गीय जनावरांमध्ये ही लक्षणे व आजार आढळून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे.

मानवाला धोका नाही
गाईवर्गीय जनावरांच्या दुधापासून मानवामध्ये हा विषाणू प्रवेश करीत नाही. त्यामुळे गाईच्या दुधापासून मानवाला कुठलाही धोका नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये, अशी माहिती दुग्ध अभ्यासात देतात.

 

Back to top button