कारवाईच्या भीतीचा गुर्‍हाळचालकांनी घेतला धसका, ठिकठिकाणी गुर्‍हाळचालकांच्या बैठका | पुढारी

कारवाईच्या भीतीचा गुर्‍हाळचालकांनी घेतला धसका, ठिकठिकाणी गुर्‍हाळचालकांच्या बैठका

नानगाव : पुढारी वृत्तसेवा: ”विळखा गुर्‍हाळ प्रदूषणाचा” या मथळ्याखाली दौंडच्या भीमा नदीच्या पट्ट्यातील व परिसरातील गावांत सुरू असलेल्या गुर्‍हाळामुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणावर निर्भीडपणे दै. ‘पुढारी’ने सर्वसामान्य जनतेचा आवाज उठविला. याच वृत्ताची दखल घेत तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत सध्या गुर्‍हाळचालक व मालक यांच्या बैठका सुरू असून, प्रदूषण करणार्‍या वस्तू न जाळण्यासाठी ते पुढाकार घेताना दिसत आहे, तर काही ठिकाणी संबंधितांनी कारवाईच्या भीतीचा धसका घेतला आहे. मात्र, कचरा न जाळण्याचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.

गुर्‍हाळ हा व्यवसाय जसा ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी, गावच्या आर्थिक विकासासाठी, उत्पन्नासाठी, उद्योग व्यवसायासाठी उपयुक्त आणि फायद्याचा आहे, तसाच तो प्रदूषण होणार्‍या वस्तू जाळल्याने गुर्‍हाळ चालक व मालक, कामगार व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी देखील तितकाच घातक व धोकादायक आहे. त्यामुळे उंटावरून शेळ्या हाकणार्‍या स्वयंघोषित नेत्यांनी या प्रदूषणाच्या विषयाकडे पाहण्यासाठी उशिरा का होईना जाग येत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात गुर्‍हाळ व्यवसाय सुरू आहे. गुर्‍हाळमुळे मिळणारा पैसा हा सर्वांनाच दिसत आहे. मात्र, याच पैशांमागील प्रदूषण व विविध समस्या आजपर्यंत कोणालाच कशा दिसल्या नाहीत, हा प्रश्न आहे. गुर्‍हाळामुळे अनेकांना रोजगार मिळाला देखील असेल. मात्र, त्याचबरोबर कामगारांची पुढची पिढी मात्र शिक्षणापासून वंचित राहत आहे. गुर्‍हाळ व्यवसायामुळे होणारा फायदा सर्वांना दिसतो. मात्र, शिक्षणापासून वंचित राहणार्‍या त्या चिमुकल्या जिवांचे आरोग्य आणि शिक्षण कोणालाच दिसत का नाही, असाही सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे.

सध्या या गुर्‍हाळ व्यवसायात गावागावांतील राजकीय मंडळी दिसत असून, त्यामध्ये तरुण मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करताना दिसत आहे. तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे तरुण व्यावसायिकांनी व्यवसाय करताना सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच गावात जर कोणी अशाप्रकारे प्रदूषण करणार्‍या वस्तू जळणासाठी वापरत असेल, तर त्याला ठणकावून सांगितले पाहिजे. मात्र, हीच मंडळी जर अशा गुर्‍हाळचालक व मालक यांना पाठीशी घालत असतील, तर उद्याचे भवितव्य काय? त्यामुळे “तुमचा होतोय खेळ; मात्र आमचा जातोय जीव” असे म्हणण्याची वेळ यायला नको.

दिलेला शब्द गुर्‍हाळचालक व मालकांनी पाळावा
सध्या काही ठिकाणी गुर्‍हाळचालक व मालक स्वत:हून पुढे येत प्रदूषण होणार्‍या वस्तू जाळल्या जाणार नाहीत, असा संकल्प करून ग्रामस्थांना शब्त देत आहेत. मात्र, हा दिलेला शब्द पाळला जावा, दिलेले आश्वासन हवेत विरून जाऊ नये, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

‘तू कर मारल्यागत आणि मी करतो रडल्यागत’ अशी स्थिती नको
अनेक वर्षांपासून स्वत:चा खिसा गरम ठेवण्याच्या नादात गुर्‍हाळचालक व मालकांनी गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम केले आहे. मात्र, काही संघटना आणि नागरिकांनी आवाज उठविल्याने त्यांना कुंभकर्णी झोपेतून जाग आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा न जाळण्याचा निर्णय होत असेल, तर तो सर्वांसाठीच चांगला आहे. परंतु, “तू कर मारल्यागत आणि मी करतो रडल्यागत” अशी परिस्थिती व्हायला नको.

Back to top button