लोणी-धामणी : पोळा सणासाठी एकत्र येण्यास बंदी | पुढारी

लोणी-धामणी : पोळा सणासाठी एकत्र येण्यास बंदी

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा :  लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास शासनाने बंदी केली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे पोळा साजरा केला नसताना पुन्हा लम्पीमुळे हा सण साजरा होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यात लम्पी चर्मरोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग प्रादुर्भाव केवळ गोवंशीय पशुधनात आढळून आलेला आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने अधिनियमातील अधिसूचनेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र हे नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या अधिसूचनेद्वारे लम्पी चर्मरोगाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे, म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच या पशुधनाच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.

पोळा सणानिमित्त गावातील बैल मोठ्या प्रमाणात एकत्र आणून, त्यांची मिरवणूक निघण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गावात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांत लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास शासनाकडून बंदी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने याबाबत नोटीस बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी देऊन सर्व पशुपालकांना अवगत करण्याचे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे.

Back to top button