पिंपरी : पोलिस कर्मचार्‍यास शिवीगाळ; जेसीबी चालकाला अटक | पुढारी

पिंपरी : पोलिस कर्मचार्‍यास शिवीगाळ; जेसीबी चालकाला अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा  : पोलिस व्हॅनवर दगडफेक करून तोडफोड करणार्‍या जेसीबी चालकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. 19) मध्यरात्री अडीचच्या सुमारास भोसरी वाहतूक विभाग येथे घडली. राम कुंडलिक शिंदे (34, रा. घोडकी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या जेसीबी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई रामदास वाव्हळ यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास वाव्हळ हे भोसरी वाहतूक विभागात नेमणुकीला आहेत. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री ते रात्रपाळी कर्तव्यावर होते. दरम्यान, जेसीबी चालक आरोपी राम शिंदे हा मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करीत रस्त्याने पायी जात होता.

त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याने वाव्हळ यांनी त्याला आपण पोलिस असल्याचे सांगून मदतीसाठी विचारपूस केली. त्यावर त्याने फिर्यादी यांच्याशीच हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, भोसरी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या पोलिस व्हॅनवर दगड मारून काच फोडली. फिर्यादी यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार, भोसरी पोलिसांचे बिट मार्शल आणि डायल 112 या पथकांनी येऊन आरोपीला अटक केली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button