पिंपरी : बेडअभावी नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ | पुढारी

पिंपरी : बेडअभावी नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ

राहुल हातोले : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत 8 मुख्य रुग्णालये आणि 29 दवाखाने आहेत. शहराची लोकसंख्या 25 लाखांहून अधिक आहे. मात्र, लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. या रुग्णालयांपैकी केवळ वायसीएम, आकुर्डी आणि पिंपरी येथील पालिकेच्या रुग्णालयांत नवजात बालक अतिदक्षता विभाग आहे. मात्र, बेडच्या अनुपलब्धतेमुळे अनेकांना आपल्या बाळाच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालय गाठावे लागते.

खासगी रुग्णालयांचे बिल आवाक्याबाहेर
बर्‍याचदा नवजात बालकांना नवजात अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) गरज लागते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटूंबाना खासगी रुग्णालयाचे बिल भरणे परवडत नाही. त्यामुळे नागरिक महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मुलांना घेऊन जातात; बेड उपलब्ध नसल्याने त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे.

नवजात अतिदक्षता  विभागाची गरज का?
अकाली जन्माला आलेल्या बाळाचे वजन कमी असते. त्यामुळे त्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा वेळी एनआयसीयूची गरज भासते. बाळाला श्वासोश्वासाचा त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरची गरज भासते. कावीळ, न्यूमोनिया आदी आजारासाठी एनआयसीयूची गरज भासते. बाळाची मातेच्या पोटातच विष्टा झालेली असते. अशा वेळी नवजात अतिदक्षता विभागाची गरज भासते.

 

शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, बालरोग तज्ज्ज्ञांची उणीव भासत आहे. बर्‍याचदा या पदासाठी जाहिरात दिल्या, मात्र पद भरले जात नाही. परिणामी नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सुरू करण्यात आले नाहीत. मात्र लवकरच थेरगाव व भोसरी येथे हा विभाग सुरू करण्यात येणार आहे.
   – डॉ. लक्ष्मण गोफणे,  सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी,  पिं. चिं. महापालिका.

 

आमचे बाळ आजारी असल्याने डॉक्टरांनी आम्हांला दाखल करण्याचा सल्ला दिला. आम्ही वायसीएममध्ये याबाबत विचारणा केली. तर बेड रिकामे नव्हते. म्हणून आकुर्डी व पिंपरी येथील एनआयसीयू विभागात विचारणा केली; मात्र बेड उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी खासगी रुग्णालयात बाळाला दाखल करावे लागले. दिवसाला आता दहा ते पंधरा हजार रुपये मोजावे लागत आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पैशासाठी नातेवाईक, मित्र व मैत्रिणींकडे हात पसरावे लागत आहेत. मुलाचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे; परंतु पैशाचे सोंग कसे करणार?
                                                                            – एक, नागरिक, भोसरी.

 

Back to top button