पुणे : सहा महिन्यात ९३ खांब, हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोेचे तीन ठिकाणी काम सुरू | पुढारी

पुणे : सहा महिन्यात ९३ खांब, हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोेचे तीन ठिकाणी काम सुरू

ज्ञानेश्वर बिजले :

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसर्‍या मार्गाचे काम वेगाने सुरू झाले असून, सहा महिन्यांत तीन ठिकाणी मेट्रोचे 93 खांब बांधण्यात आले आहेत. सुमारे तीनशे खांब उभारणीसाठी खोदकाम झाले आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत मेट्रो पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  हिंजवडी आयटी पार्क येथून सुरू होणारी ही मेट्रो वाकडपासून पुणे-मुंबई महामार्गालगतच्या मार्गाने बाणेरजवळ पोहोचेल. तेथून बाणेर रस्त्याने पुणे विद्यापीठ चौकातून ती शिवाजीनगर येथील न्यायालयापर्यंत जाईल. तेथे महामेट्रोचे अन्य दोन मेट्रो मार्गही पोहोचणार आहेत. त्यामुळे न्यायालयाजवळील
वाहतूक हबपासून प्रवाशांना अन्य मार्गावरील मेट्रोच्या प्रवासाला जाता येईल.

हिंजवडीला पहिले स्थानक
विद्यापीठ रस्ता, बाणेर व हिंजवडी या तीन ठिकाणी खांबासाठी पाया खोदण्याचे काम एप्रिलमध्ये सुरू झाले. मेट्रो पुलासाठी विद्यापीठ रस्त्यावर 32, बाणेरला 19 आणि हिंजवडीला 30, असे एकूण 81 खांब उभारण्यात आले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेट्रोचे पहिले स्थानक बांधण्यात येत असून, त्यासाठी बारा खांब उभारण्यात आले आहेत.
खांबाच्या पायासाठी एक हजार 426 ठिकाणी जमिनीमध्ये पाया घेण्यासाठी खोदकाम (पायलिंग) करून त्यात काँक्रीटीकरण करण्यात आले. पुलाच्या खांबासाठी चार पायलिंग आणि स्थानकाच्या खांबासाठी सहा पायलिंग करावे लागतात. जमिनीखाली बांधलेल्या पायलिंगच्या खांबांवर पाया बांधून त्यावर खांब उभारला जातो. पायलिंगचे काम गतीने होत असल्याने त्यावरील खांब बांधण्यास वेग येणार आहे.  पीएमआरडीएने ताथवडे येथील यशदाची 39 एकर जागा कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या स्वरूपात घेतली आहे. तेथे टाटा प्रोजेक्ट्सने पुलासाठीचे सेगमेंट तयार करण्यात येत आहेत.

देशातील पहिला खासगी मेट्रो प्रकल्प
देशामध्ये खासगी संस्थेच्या मदतीने हा पहिला मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार वर्षांपूर्वी त्याचे भूमिपूजन झाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (टाटा आणि सिमेन्स यांचा संयुक्त भागीदारी प्रकल्प) यांच्या माध्यमातून मेट्रोचा हा प्रकल्प उभारण्यात येईल. नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक जमीन ताब्यात आल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये प्रत्यक्ष खांब उभारणीला प्रारंभ करण्यात आला. त्यापूर्वी फेब—ुवारीमध्ये पुलासाठी सेगमेंट तयार करण्यास सुरुवात झाली.

न्यायालयाजवळ ट्रान्सपोर्ट हब
महामेट्रोमार्फत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच वनाज ते रामवाडी या दोन मार्गावरील मेट्रो सेवा 2024 मध्ये सुरू होईल. सध्या या दोन्ही मार्गांवरील काही भागांत मेट्रो सुरू झाली आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी त्या मार्गात वाढ होईल. याच काळात तिसरा मार्गही न्यायालयाच्या दिशेने वेगाने पोहचेल. त्यामुळे न्यायालयाजवळ तिन्ही मेट्रो मार्गांवरील प्रवाशांना अन्य मार्गांवरील मेट्रोत ये-जा करता येईल. पुणे रेल्वेस्थानक तसेच शिवाजीनगर एसटी स्थानक तेथून जवळ असल्याने पुण्यातील वाहतुकीसाठी ते सर्वांत मोठे केंद्र ठरणार आहे. त्या ठिकाणी रिक्षा, पीएमपीसह अन्य सार्वजनिक वाहतूक सुविधाही उपलब्ध होतील.

Back to top button