भिगवण : जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद | पुढारी

भिगवण : जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद

भिगवण, पुढारी वृत्तसेवा: तब्बल सहा तालुक्यांत धारदार शस्त्रे घेऊन जबरी चोरी करणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांना भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे. चैतन्य पांडुरंग शेळके (वय 20) आणि किशोर सहदेव पवार (वय 20, दोघेही रा. भोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्याकडून 45 हजार 130 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, शनिवारी (दि. 17) रात्री भिगवण पोलिस गस्त घालत असताना त्यांना दोघे संशयितरीत्या फिरताना आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तर देऊ लागली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांची झडती घेता त्यांच्याकडे लोखंडी धारदार कोयता, लोखंडी गज, ज्युपिटर गाडी असे साहित्य मिळून आले. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. भिगवण ठाण्यासह या दोघांवर शिरूर, वारजे माळवाडी, परांडा, बारामती, यवत या ठिकाणी गुन्ह्यांची नोंद आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील आदींनी ही कामगिरी केली.

Back to top button