खारावडे : आंदगाव ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय | पुढारी

खारावडे : आंदगाव ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय

खारावडे, पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यातील मुठा खोर्‍यातील आंदगाव हे ऐतिहासिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच दृष्टीने महत्त्वाचे गाव. परंतु, या गावात खूप वर्षांपासून दारूविक्री चालू होती. अखेर आंदगाव ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दारूबंदी विषय मांडला. सर्व महिलांसह ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदी ठराव मंजूर केला. त्यानंतर दारूबंदी ठराव पौड पोलिस ठाण्यात देण्यात आला.

ग्रामसभेचे आयोजन आंदगावचे सरपंच प्रफुल्ल दत्तात्रय मारणे यांच्या अध्यक्षेखाली करण्यात आले होते. या ग्रामसभेस पौडचे पोलिस निरीक्षक श्रीकांत जाधव, बिट अंमलदार रवींद्र नागटिळक यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसभेत पोलिस निरीक्षक जाधव यांनी महिलांच्या दारूबंदीबाबतच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन योग्य मार्गदर्शन केले. त्याच्या उपस्थितीतच दारूबंदी समिती स्थापन करण्यात आली. आंदगाव ग्रामपंचायत दारूबंदी समितीमध्ये एकूण 17 सदस्य निवडण्यात आले. या समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी मारणे, तर उपाध्यक्षपदी सविता मारणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या वेळी ग्रामसेविका स्वाती गोसावी, उपसरपंच शिवाजी झुंजुरके, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास मारणे, माजी उपसरपंच रामभाऊ मारणे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मारणे, सारिका गुजर, प्रतिभा शिंदे, कमल वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button