शेतमालाच्या दराची लपवाछपवी, संकेतस्थळावर आवक, दर प्रसिद्ध करण्याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

शेतमालाच्या दराची लपवाछपवी, संकेतस्थळावर आवक, दर प्रसिद्ध करण्याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

शंकर कवडे
पुणे : शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने सुरू झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकर्‍यांकडेच दुर्लक्ष होत चालले आहे. शेतमालाचे भाव घरबसल्या समजण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने सुरू केलेल्या संकेतस्थळावर शेतमालाची अर्धवट माहिती प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन खरंच शेतकर्‍यांचे हित जोपासत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आवक व शेतमालाला मिळालेले दर राज्यासह देशभरातील शेतकर्‍यांसह खरेदीदारांना घरबसल्या कळावेत यासाठी बाजार समितीच्या संकेतस्थळावर बाजारभाव प्रसिध्द करण्यास सुरुवात झाली. सुरवातीच्या टप्प्यात सुरळीत बाजारभाव दिल्यानंतर मात्र सध्या त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मोजक्याच शेतमालाची आवक व दर संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत. यामध्ये कांदा-बटाटा विभागातील सर्व शेतमालाचे दर अपलोड झाल्याचे दिसून येतात. त्यानंतर तरकारी विभागातील आवक व दर दिसून येतात. मात्र, फळे, सुकामेवा, विड्याची पाने यामध्ये तुरळक शेतमालाचे आवक व दर प्रसिध्द करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना घरबसल्या दर समजणार असल्याचा दिंडोरा पिटणार्‍या प्रशासनाची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येते.

शेतमालाची यादी भली मोठी

प्रत्यक्षात बाजारात आवक होत असलेल्या शेतमालाच्या आवकेनुसार यादी अद्ययावत करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करत बाजारभाव रिकाम्या रकान्यासह प्रसिध्द करण्यात येतात. मुळात डिजिटल युगात आवक नसलेल्या शेतमालाची नोंद वगळणे व आवकेनुसार ती पुन्हा त्यामध्ये नमूद करणे सहज शक्य असतानाही ते करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

नोंद क्विंटलमध्ये मग क्रेट्स, बॉक्स, पेटीचे रकाने कशासाठी?

फळबाजारात विविध फळांची आवक ही गोणी, पेटी, ट्रे, बॉक्स, कॅरेट, डझन, डबा या स्वरूपात होते. तर बाजार समिती प्रशासनाकडून आवकही क्विंटलमध्ये कागदोपत्री नमूद करण्यात येते. त्यामुळे संकेतस्थळावरही आवक जाहीर करताना ती क्विंटलप्रमाणेच जाहीर होणे आवश्यक ठरते. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणीही गोणी, पेटी, ट्रे, बॉक्स, कॅरेट, डझनचे रकाने दिसून येतात.

बाजार समिती प्रशासनाकडून विविध विभागांमध्ये होणारी आवक व दर संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतात. ज्या शेतमालाचे दर प्रसिद्ध होत नाहीत त्याची महिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– मधुकांत गरड, प्रशासक,पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प विड्याची पाने

Back to top button