पशुसंवर्धन पदविधारकांनो, मदतीला या…लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे आवाहन | पुढारी

पशुसंवर्धन पदविधारकांनो, मदतीला या...लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

पुणे: लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणे जिल्ह्यातील पन्नास टक्के गावे रेड झोनमध्ये आली आहेत. शासकीय डॉक्टरांच्या पथकाकडून गावोगावी लसीकरण सुरू आहे. परंतु, त्यावर मर्यादा येत असल्याने खासगी पशुधन पर्यवेक्षक तसेच डॉक्टरांच्या मदतीने लसीकरणाला अधिक गती देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने खासगी पशुसंवर्धन पदविकाधारकांना या कठीण परिस्थितीत लसीकरणाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या 603 जनावरांना लम्पीची लागण झाली असून त्यापैकी 24 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 8 लाख जनावरे आहेत, त्या तुलनेत ही पदसंख्या अपुरी आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी विशेष बाब म्हणून 32 नवीन पशुधन पर्यवेक्षकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्याची परवानगी दिली आहे. कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खासगी पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचार्‍यांना लसीकरण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांना ती सरकारी दवाखान्यांतून मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येकी 3 रुपये लसटोचणी म्हणून मानधन देण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात सध्या खासगी 950 पशुधन पर्यवेक्षक तर 450 खासगी डॉक्टर आहेत.

यापूर्वी खासगी डॉक्टरांकडून लस घेऊ नका, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, लम्पी स्किनचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्या प्रशासनाकडे असलेले मनुष्यबळ पहाता लसीकरणाला मोठा विलंब होऊ शकतो. त्यामुळे यामध्ये खासगी प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांनादेखील आता या शासकीय लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.

Back to top button