भोसरी : 6100 मीटर उंचीवरून ‘लेक वाचवा’चा संदेश | पुढारी

भोसरी : 6100 मीटर उंचीवरून ‘लेक वाचवा’चा संदेश

भोसरी : चढाईसाठी नावाप्रमाणेच अजस्त्र अजोड असणार्‍या उत्तराखंडमधील काला नाग (ब्लॅक पीक) पहाडावर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भोसरीतील गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली आहे. 6387 मीटर उंचीच्या शिखरावर चढाई करुन भोसरीतील गिरिजा लांडगे व धनंजय लांडगे यांनी ‘लेक वाचवा, लेक जगवा आणि लेक वाढवा’चा संदेश दिला आहे.
आठ गिर्यारोहकांचा सहभाग उत्तराखंड येथील बंदरपूंछ पर्वतरांगेतील अतिदुर्गम व अजस्त्र असा काला नाग 6387 मीटर उंची असणारा पर्वत आहे. हिमभेगा चढाईसाठी 75-80 अंश कोनात असणारा तीव्र चढ आणि उणे 15-20 अंश सेल्सियस असणारे तापमान यामुळे चढाईसाठी अती कठीण मानला जातो. या शिखरावरील मोहिमेत आठ गिर्यारोहकांचा सहभाग होता. त्यामध्ये गिरिजा लांडगे, धनंजय लांडगे, गोपाल भंडारी, ओंकार पडवळ, शालिनी शर्मा ,निखिल कोकाटे तर सुनील पिसाळ (51 वर्षे ) व विश्वजीत पिसाळ (50 वर्षे) होते.

नैसर्गिक अडचणींवर केली मात

पंधरा दिवसांच्या मोहिमेत गिर्यारोहकांनी अनेक समस्यांवर मात करीत यशस्वी चढाई केली. सेमी अल्पाईन पद्धत असल्याने मोहिमेसाठी लागणारे साहित्य प्रत्येकी 25 किलो वजन घेऊन दररोज सरासरी 9-10 किमी पायी ट्रेक केला आणि दररोज 500-700 मीटरपर्यंत उंची गाठत सर्वजण कँपपर्यंत पोहोचले. बेस कँपपर्यंत पोहोचण्यासाठी आलेल्या अनेक अडचणींवर मात करत टिमने बेस कँप ते समिट कँपपर्यंत भूस्खलनने पूर्णपणे बंद झालेल्या रस्त्यांवर स्वतः रस्ता तयार करत नैसर्गिक अडचणींवर मात करत त्यांनी सम्मीट कँप गाठला.

गाईडबरोबर टीमने शोधला नवीन मार्ग

पर्वतावर चढाईसाठी असणारा पारंपरिक नेहमीचा मार्ग अदृश्य व सदृश हिमभेगांमुळे बंद झाला होता. स्थानिक गाईडबरोबर टीमने नवीन मार्ग शोधत 5700 मीटरपर्यंत उंची गाठली. त्या वेळी सकाळचे 7.30 वाजले होते. या गिर्यारोहण मोहिमेस दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था, सह्याद्री रोव्हर्स, ध्यास सह्याद्री, शिवदुर्ग मित्र लोणावळा, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, अ‍ॅडव्हेंचर डायरीज, अ‍ॅडव्हेंचर मंत्रा, माउंटेन स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी या संस्थांचे सहकार्य लाभले.

उगवलेल्या सूर्यामुळे माथ्यावरचे तापमानही वाढू लागले होते. शिखर माथ्यावर असणारा बर्फ वितळू लागला होता. शिखर माथ्यावर 80 अंश कोनातली चढाई करण्याचा मार्ग पायाखालून सटकणार्‍या बर्फाच्या लाद्यांमुळे अवघड बनू लागला होता. परिणामी पोहोचण्याची लढाई खूपच अटीतटीची व शारीरिक व मानसिकतेचा कस बघणारी झाली होती. अखेर गिर्यारोहकाने सकाळी 9.56 मि. 6010 मीटरपर्यंत शिखरावर यशस्वी चढाई केली.
– धनंजय लांडगे, गिर्यारोहक

Back to top button