पुणे: निवृत्त अधिकाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला, टाकळी हाजीमधील घटना | पुढारी

पुणे: निवृत्त अधिकाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला, टाकळी हाजीमधील घटना

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. या अधिकाऱ्यांच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे उचकटून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असे अंदाजे २ लाख ६५ हजारांची चोरी केली आहे.

प्रभाकर गावडे हे शेतातील घरी मुक्कामी होते तर महादेव गावडे हे पुण्यात वास्तव्यास आहेत. सोमवारी (दि. १९) रात्री त्यांच्या येथे घरफोडी झाली. मंगळवारी (दि. २०) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या सुप्रिया अमोल गावडे यांनी फोनवरून प्रभाकर गावडे यांना तुमचे घर उघडे दिसत आहे, कोणीतरी दरवाजा तोडलेला दिसत आहे, अशी माहीती दिली. ते घरी गेल्यावर दाराचा कडी कोयंडा तुटुन कुलुप पडलेले दिसले. कपाटाचे लॉकर उचकटुन त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच महादेव गावडे यांच्या घरातील चांदीची गणेशाची मूर्ती चोरी झाली असून त्यांचे दोन टेबल फॅन प्रभाकर गावडे यांच्या घरात चोरट्याने ठेवलेले दिसले.

दोघांच्या घरातील ५ तोळे सोन्याचे दागिने, एक चांदीची मूर्ती व रोख रक्कम असे अंदाजे २ लाख ६५ हजार रूपयांची चोरी झाली, अशी फिर्याद प्रभाकर गावडे यांनी पोलिसांत दिली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस शिपाई विशाल पालवे, पोलिस हवालदार अनिल आगलावे यांनी भेट दिली असून तपास सुरू केला आहे. चोऱ्यांना आळा बसण्यासाठी सक्षम नागरिकांनी घरांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी केले आहे.

 

Back to top button