तळेगावात भूसंपादनच नाही! ‘फॉक्सकॉन’ने जागा पसंत करूनही फाईल दोन वर्षांपासून धूळखात

तळेगावात भूसंपादनच नाही! ‘फॉक्सकॉन’ने जागा पसंत करूनही फाईल दोन वर्षांपासून धूळखात

सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : गेल्या काही दिवसांपासून फॉक्सकॉन व वेदांताचा संयुक्त सेमीकंडक्टर उत्पादनाचा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्याने जोरदार राजकीय खडाजंगी सुरू आहे. परंतु, तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने तळेगाव टप्पा चारमधील पसंत केलेल्या जागेचे भूसंपादनच झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 2016 पासून एमआयडीसीतील या जागेवर भूसंपादनाचे शिक्के पडले असले तरी ही जागा अद्यापही संपादित झालेलीच नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडात वेदांता व फॉक्सकॉन यांनीदेखील आपला प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे दिसून येत आहे.

तळेगाव टप्पा चारसाठी तब्बल 5400 एकर जागा संपादित करण्यात येणार असून, भूसंपादनासाठी आवश्यक असलेले नोटिफिकेशन काढणे व निधी उपलब्ध करून देण्यासाठीची फाईल गेले दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे धूळखात पडून आहे. यामुळेच इतर अनेक कारणांपैकी महाआघाडी सरकाराचा हलगर्जीपणा देखील फॉक्सकॉन गुजरातमध्ये जाण्यास कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी)च्या वतीने तळेगाव टप्पा चारमध्ये निगडे, पवळेवाडी, आंबळे आणि कल्हाट या गावातील गावठाण सोडून शिल्लक सुमारे 5400 एकर जमीन संपादित करण्याचे पहिले नोटिफिकेशन सन 2016 मध्ये काढण्यात आले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुढाकार घेऊन या जागेचे दर निश्चित करून शासनाच्या हाय पॉवर समितीला अंतिम दर निश्चितीचा प्रस्ताव सादर केला.

शासनाने तळेगाव टप्पा चारसाठी 73 लाख 50 हजार रुपये दर देखील निश्चित केला. यामध्ये एमआयडीसीने नोटिफिकेशन जाहीर केलेल्या चार गावांपैकी निगडे, कल्हाट या गावांमध्ये युको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे ही दोन गावे युको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला, परंतु गेल्या तीन वर्षांपासून प्रस्ताव मंजूर करावा यासाठी काहीही हालचाल झाली नाही.

लोकांच्या सातबारावर एमआयडीसीचे शिक्के पडले, पण जमिनीचे संपादन होत नसल्याने शेतक-यांनी आंदोलन केले. त्यानंतर जाग आलेल्या शासनाने आंबळे गावचे भूसंपादन करण्याचे नोटिफिकेशन काढले. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रचंड पाठपुरावा करण्यात आला.

त्यानंतर कुठे केवळ 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सध्या आंबळे गावात भूसंपादन सुरू आहे, परंतु गेले दोन वर्षांपासून तळेगाव टप्पा चारसाठी भूसंपादन करण्याची फाईल राज्य शासनाकडे धूळखात आहे. या टप्पा चारमध्येच फॉक्सकॉन व वेदांता दीड लाख कोटींचा प्रकल्प उभारणार होती.

फॉक्सकॉन व वेदांता कंपनी तब्बल दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तळेगाव एमआयडीसीत करणार होती. परंतु तळेगाव टप्पा चारमध्ये जमीन शासनाच्या ताब्यात नाही, रस्ते, कनेक्टिव्हिटीचा प्रश्न व अनेक अडचणी आहेत. एखाद्या प्रकल्पासाठी एवढी मोठी गुंतवणूक होत असेल तर हा प्रकल्प त्वरित सुरू व्हावा यासाठी कंपनीचा प्रयत्न असतो, परंतु जमीनच शासनाच्या ताब्यात नसेल तर, रस्ते, लाईट, कनेक्टिव्हिटीची सुविधा कधी निर्माण करणार, एखादा प्रकल्प येण्यापूर्वीच या पायाभूत सुविधा तयार पाहिजेत.
                                   – निरंज गुप्ता, सचिव, तळेगाव इंडस्ट्रीयल असोसिएशन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news