कळस : चारचाकीची काच फोडून पळवले 36 लाख | पुढारी

कळस : चारचाकीची काच फोडून पळवले 36 लाख

जंक्शन : दोन अनोळखी चोरट्यांनी कळस (ता. इंदापूर) गावच्या हद्दीमध्ये कळस-जंक्शन रस्त्यावर चारचाकी गाडीचा पाठलाग करून आपली गाडी आडवी उभी करून समोरच्या गाडीच्या काचा फोडून 36 लाख 31 हजार 900 रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.  याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गणेश लक्ष्मण शेलार (रा. पळसदेव-माळवाडी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

शनिवारी (दि. 17) गणेश शेलार व त्यांचे सहकारी बबन चंदर कोरडे (रा. लोणी देवकर) या दोघांनी बारामती व जंक्शनमधील स्टील दुकानातून 36 लाख 31 हजार 900 रुपयांची रोख रक्कम गोळा केली होती. ही रक्कम घेऊन दोघे सांयकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जंक्शन-कळस रस्त्याने चारचाकी गाडीमधून लोणी देवकरमधील कंपनीमध्ये निघाले होते. कळस गावच्या परिसरात माळरानावर अनोळखी चारचाकी गाडीचालकाने शेलार यांना गाडी थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडून 36 लाख 31 हजार 900 रुपयांची असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली.

Back to top button