

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या जेजुरीच्या कडेपठार खंडोबा मंदिरात रविवारी( दि.18) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास सूर्याच्या किरणांनी थेट गाभार्यात प्रवेश करून संपूर्ण गाभारा सुवर्णमय केला. हा किरणोत्सव पुजारी सेवक वर्ग व नित्यसेवेकरीना अनुभवता आला.
वर्षातून दोन वेळा मार्च आणि सप्टेंबर महिन्यात विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात, यामुळे देशातील पूर्वमुखी मंदिरात ही किरणे सरळ प्रवेश करतात. दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने मंदिरात किरणोत्सव पाहण्यास मिळाला नाही. रविवारी पहाटे पूजेच्या वेळी सूर्यकिरणांनी कडेपठार मंदिरात थेट प्रवेश केला, संपूर्ण गाभारा आणि देवाच्या मूर्ती या सुवर्ण किरणांनी उजाळून निघाल्या. हा किरणोत्सव झाल्यानंतर पुजारी सेवकवर्ग आणि नित्यसेवेकरी वर्गाने भंडाराची उधळण करून मल्हारी मार्तंडाचा जयघोष केला.