पुणे : वखार पावतीवरील तारण कर्ज योजना कौतुकास्पद; केंद्रिय अन्न सचिव सुंधाशु पांडे यांचे गौरवोद्वगार | पुढारी

पुणे : वखार पावतीवरील तारण कर्ज योजना कौतुकास्पद; केंद्रिय अन्न सचिव सुंधाशु पांडे यांचे गौरवोद्वगार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून राबविण्यात येणार्‍या ब्लॉकचेन प्रणालीद्वारे शेतकर्‍यांना वखार पावतीवर त्वरित ऑनलाईन तारण कर्ज देण्याची योजना कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वगार केंद्रिय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी येथे काढले. वखार महामंडळाच्या सातारा येथील वखार केंद्रास त्यांनी शुक्रवारी (दि.16) भेट दिली. त्यावेळी त्यांनी भारतीय अन्न महामंडळाचा अन्नधान्य साठवणूक व्यवसाय व वखार महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

महामंडळामधील गोदामांचे केंद्र सरकारच्या वखार विकास आणि नियामक प्राधिकरणातंर्गत (डब्ल्यूडीआरए) उल्लेखनीय नोंदणी केल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, भारतीय अन्न महामंडळाचे मुंबई क्षेत्राचे महाव्यवस्थापक मनमोहनसिंग सारंग, विभागीय व्यवस्थापक मनिषा मीना, पुणे विभागीय आयुक्तालयातील पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, सातारा येथील जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते.

वखार महामंडळाचे अध्यक्ष दिपक तावरे यांनी महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली. ब्लॉकचेन प्रणालीद्वारे शेतकर्‍यांना वखार पावतीवर त्वरित ऑनलाईन कर्जवाटप, 161 वखार केंद्राचे नोंदणीकरण, समृध्दी महामार्गालगत जांबरगांव (जि.औरंगाबाद) येथे अ‍ॅग्री लॉजिस्टिक पार्क तसेच मानकापूर, आर्वी (जि.वर्धा) येथे कॉटन लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीबाबत माहिती दिली. त्यावरही पांडे यांनी समाधान व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

Back to top button