पुणे : हंबीरवर हल्ला करणार्‍या सूत्रधारासह दोघांना अटक | पुढारी

पुणे : हंबीरवर हल्ला करणार्‍या सूत्रधारासह दोघांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी, तसेच मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी तुषार हंबीरवरील हल्ला प्रकरणात फरारी असणार्‍या मुख्य सूत्रधारासह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने उत्तमनगर परिसरातून अटक केली. प्रकाश उ्णव रणछोडदास दिवाकर (वय 26, रा. भीमनगर, उत्तमनगर) असे मुख्य सूत्रधाराचे नाव असून, परवेज ऊर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय 21, रा. उरुळी देवाची) असे अन्य अटक केलेल्याचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात हंबीर याच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तो येरवडा कारागृहात आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला 25 ऑगस्टला ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर येथे उपचार सुरू होते. 5 सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयात घुसून त्याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

यातील चौघांना लागलीच अटक करण्यात आली होती. त्यांच्या तपासात मुख्य सूत्रधार प्रकाश ऊर्फ वैष्णव असल्याचे समोर आले. तर, इतर आरोपींचीदेखील माहिती मिळाली होती. त्यांचा शोध घेत असताना युनिट पाचच्या पथकाला मुख्य हल्लेखोर उत्तमनगर येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, अंमलदार प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले यांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.

Back to top button