‘इंटर्नशिप’साठी ‘क्रेडिट’ची व्यवस्था करा; एआयसीटीईच्या तंत्रशिक्षण देणार्‍या महाविद्यालय, विद्यापीठांना सूचना | पुढारी

‘इंटर्नशिप’साठी ‘क्रेडिट’ची व्यवस्था करा; एआयसीटीईच्या तंत्रशिक्षण देणार्‍या महाविद्यालय, विद्यापीठांना सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विज्ञान तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करून त्याला विशिष्ट ‘क्रेडिट’ द्यावेत, अशा सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रशिक्षण देणार्‍या सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांना दिल्या आहेत.

या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात त्या पद्धतीने बदल करावेत, असेही एआयसीटीईतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. उद्योगाशी संबंधित शिक्षण या नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार हे बदल केले जाणार आहेत. आतापर्यंत तंत्रशिक्षणातील बहुतांश विषयांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना थिअरी, प्रॅक्टिकल, तोंडी परीक्षा अशा पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत होता. या विद्यार्थ्यांना फिल्ड व्हिजिट किंवा इंटर्नशिप लागू होती, मात्र त्याचे गुणांकन अंतर्गत मूल्यमापनाद्वारे व्हायचे.

आता यामध्ये बदल करून इंटर्नशिप हा विषय अभ्यासक्रमात आणून त्याला स्वतंत्र क्रेडिट दिले जावेत, अशा सूचना एआयसीटीईकडून करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठाने आपल्या जवळच्या उद्योग क्षेत्रांशी संपर्क साधून त्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपची व्यवस्था करावी, असे एआयसीटीईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठ परिसरातील उद्योगांशी सामंजस्य करार करून काही छोटे अभ्यासक्रमही उद्योग व विद्यापीठांनी एकत्र येऊन तयार करून घ्यावेत, हे अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थ्यांना क्रेडिट देऊन त्यांना शिक्षण पूर्ण होताच उद्योगांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्लेसमेंटद्वारे मदत करावी, यासंदर्भातही ‘एआयसीटीई’ने सविस्तर सूचना दिल्या आहेत.

या आहेत एआयसीटीईच्या सूचना
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांवर भर द्यावा.
उद्योग आणि विद्यापीठांनी सामंजस्य करार करून उद्योगांशी संबंधित छोटे अभ्यासक्रम तयार करावेत.
इंटर्नशिप प्रोग्राम तयार करून त्याला क्रेडिट दिले जावेत.
येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे बदल अस्तित्वात आणावेत.
प्रथम क्रमांकाचा मानकरी नाही; स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिलाच प्रकार

Back to top button