पुणे : धो-धोचा विक्रम! 250 मिमी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

शहरात रविवारीही दुपारनंतर ढगांची गर्दी झाली. बंडगार्डन पुलावरुन घेतलेले छायाचित्र.  (छाया : यशवंत कांबळे)
शहरात रविवारीही दुपारनंतर ढगांची गर्दी झाली. बंडगार्डन पुलावरुन घेतलेले छायाचित्र. (छाया : यशवंत कांबळे)
Published on
Updated on

पुणे : गेल्या दोन हंगामांत प्रथमच शहरातील पावसाने 800 मिलिमीटरचा पल्ला ओलांडला असून, सरासरीपेक्षा यंदा 250 मिमी जास्त पाऊस झाला आहे. हंगाम संपण्यास अजून आठ दिवस बाकी असल्याने यात आणखी भर पडू शकते. दरम्यान, आगामी सहा दिवस शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मागच्या वर्षीच्या हंगामात (2021) शहरात 540 मिलिमीटर पाऊस झाला होता. जूनमध्ये 100 मिमीची नोंद झाली. मात्र, जुलै-ऑगस्टमध्ये कमी बरसला. ती तूट ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने भरून काढली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये फक्त 84 मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र, यंदाच्या हंगामात जून महिन्यात केवळ 34 मिलिमीटरची नोंद झाली.

जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात चांगला पाऊस होत असल्याने शहरातील पाऊस विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. पाषाण भागात जून ते 18 सप्टेंबर या कालावधीत 847.5 मिमी, तर शिवाजीनगर भागात 781.9 मिमी, तर लोहगाव येथे 698.1 मिमी पावसाची नोंद झाली. शहराचा सरासरी पाऊस 532 मिमी इतका आहे. यंदा 250 मिमी पाऊस जास्त झाला आहे.

सहा दिवस पावसाचे…
शहरात 19 ते 24 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. मान्सून परतीला निघाला असून, तो राजस्थानातून 21 रोजी निघणार आहे. महाराष्ट्रात येईपर्यंत 28 सप्टेंबर उजाडणार आहे. त्यामुळे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा पावसाचा राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. आगामी सहा दिवस म्हणजे 19 ते 24 पर्यंत शहरात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आर्द्रता वाढली…
रविवारी दुपारीच शहराला चारही बाजूंनी काळ्याभोर ढगांनी घेरले. तापमान कमी होऊन गार वारे सुटल्याने थंडी वाजू लागली. त्यात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने शहरात दुपारीच काळोख तयार झाला. शहराची आर्द्रताही 90 ते 97 टक्क्यांवर गेल्याने जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. शिवाजीनगर 90 टक्के, पाषाण 97 टक्के, लोहगाव 88 टक्के इतकी आर्द्रता रविवारी भरली; तर कमाल तापमान 29.7, तर किमान तापमान 21.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

सप्टेंबरमधील रेकॉर्ड ब्रेक पाऊस
वर्ष पाऊस (मिमीमध्ये)
2022 250 (पेक्षा अधिक)
2021 84
2020 288
2018 30
2017 151,1
2016 585
2015 173.7
2014 128.3
2013 221.7
2012 54.9

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news