सिंहगडावरील हत्ती टाक्यात पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; शेवाळावर पाय घसरून घडली दुर्घटना | पुढारी

सिंहगडावरील हत्ती टाक्यात पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; शेवाळावर पाय घसरून घडली दुर्घटना

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांचा गडावरील खोल हत्ती टाक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
शाहिद मुल्ला (वय 18, रा. मोशी, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. रविवारी (दि. 18) दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तुडुंब भरलेल्या खोल टाक्यात पडून बेपत्ता झालेल्या शाहिद याचे प्राण वाचविण्यासाठी स्थानिक मावळ्यांनी प्राणाची बाजी लावून शर्थीचे प्रयत्न केले. त्याला खोल टाक्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत शाहिद याचा मृत्यू झाला होता.

इयत्ता बारावीमध्ये शाहिद मुल्ला शिकत आहे. एका स्कूलच्या 60 विद्यार्थ्यांना घेऊन स्कूलचे तीन शिक्षक सिंहगडावर रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी आले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास शाहिद हा सहकारी चार-पाच विद्यार्थ्यांसह हत्ती टाक्याच्या खालच्या बाजूच्या कठड्यावरून चालला होता. रिमझिम पाऊस पडत होता. कठड्याच्या दगडावरील शेवाळामुळे शाहिद हा पाय घसरून हत्ती टाक्यात पडला. त्याला तळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मित्रांनी टाक्यात धाव घेतली; मात्र तोपर्यंत खोल पाण्यात बुडत शाहिद बेपत्ता झाला.

विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर यांनी आपले बंधू विठ्ठल पढेर, स्थानिक विक्रेते व सुरक्षारक्षक आकाश बांदल, विकास जोरकर, ओंकार पढेर, सूरज शिवतारे, पवन जोरकर, शुग्रीव डिंबळे, तुषार डिंबळे, शिवाजी चव्हाण, रामदास बांदल, राजू सोनार यांच्यासह टाक्यावर धाव घेतली. स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता विठ्ठल पढेर व इतरांनी खोल पाण्यात उतरून बेपत्ता शाहिद याचा शोध घेतला.

लोखंडी गळाला दोर बांधून काही वेळातच शाहिद याला टाक्यातून बाहेर काढले. तेथून त्याला गडाच्या वाहनतळावर आणण्यात आले. नंतर रुग्णवाहिकेतून खेड शिवापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात शाहिद याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची खबर दाखल करण्यात आली आहे, असे हवेलीचे ठाणे अंमलदार एस. टी. गिरे यांनी सांगितले.

Back to top button