पिंपरी : बदल्यांमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांत नाराजीचा सूर | पुढारी

पिंपरी : बदल्यांमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांत नाराजीचा सूर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची नियमानुसार दुसर्‍या विभागात बदली केली जाते; मात्र काही अधिकारी व कर्मचार्‍यांची मुदतपूर्वच बदली केली गेली आहे. तसेच, पदोन्नतीस पात्र असताना अचानक इतर विभागात बदली करून पदोन्नती डाववली गेली आहे. नियम डावलून होत असलेल्या या बदल्यांमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. महापालिका आस्थापनेवर साडेआठ हजार कायम अधिकारी व कर्मचारी आहेत. पालिकेच्या विविध विभागात अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

कामकामाज शिस्त असावी म्हणून तीन वर्षानंतर अधिकारी व कर्मचार्‍यांची इतर विभागात बदली केली जाते. तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांपासून सफाई कर्मचार्‍यांपर्यंत बदलीचा धडाका लावला होता. तो अजून कायम आहे. एकाच विभागात तीन वर्षे पूर्ण न झालेल्या काही अधिकारी व कर्मचार्‍यांचीही बदली करण्यात आली आहे. तसेच, पदोन्नतीस पात्र असताना ते डावलून, इतर कर्मचार्‍यांस पदोन्नती दिल्याचे प्रकार समोर येत आहेत. पदोन्नतीस पात्र असताना जाणीवपूर्वक दुसर्या विभागात बदली केल्याच्या तक्रारींही पुढे येत आहेत.

विभागप्रमुखांसमवेत चांगले व अर्थपूर्ण संबंध असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना नियम डावलून पदोन्नती दिली जात आहे. तर, विभागप्रमुखांना सहकार्य न करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची पदोन्नती डावलली जात आहे. अशा कर्मचार्‍यांना जाणीवपूर्वक दुसर्‍या विभागात बदली केली जात आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. प्रामाणिकपणे काम करूनही पदोन्नती न देता दुसर्‍या विभागात बदली केल्याने काही अधिकार्‍यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या संदर्भात प्रशासक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले की,या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची शहानिशा केली जाते. त्यात तथ्य आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल.

Back to top button