

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या रविवारी (दि. 18) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक शिक्षक एकमेकांना भिडल्याने सभेत प्रचंड गोंधळ झाला. भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. मात्र, ते या ठिकाणावरून जाताच सभेच्या दुसर्या सत्रामध्ये हा गोंधळ झाला. मे 2022 मध्ये या संस्थेची वार्षिक निवडणूक पार पडली.
यामध्ये 21-0 अशा फरकाने आमदार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गटाच्या शिक्षकांनी पतसंस्थेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीच्या अंतराने पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातील 99 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात तत्कालीन असणारे संचालक मंडळ व आताच्या विरोधी गटाच्या सभासदांनी सत्ताधारी गटाकडे माईकची मागणी केली. सत्ताधारी गटाने माईक देण्यास विलंब केला आणि त्यावरून वाद वाढत गेला.
त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने भिडले. एकमेकांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. अशा घोषणाबाजी व गोंधळमय वातावरणात सत्ताधारी गटाने सर्व विषय बहुमताने मंजूर केले. 2010 साली इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी 38 गाळे आणि सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. याकामी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सहकार्य लाभल्याने तत्कालीन संचालक मंडळाने बांधण्यात आलेल्या 38 गाळ्यांच्या व्यापारी संकुलाचे इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे हर्षवर्धनजी पाटील व्यापारी संकुल, असे नामांतर केले होते.
मागील दोन महिन्यांपूर्वी या शिक्षक पतसंस्थेची निवडणूक पार पडली. त्यानंतर नूतन संचालक मंडळाने व्यापारी संकुलास पूर्वीच्या संचालक मंडळाने दिलेले नाव बदलून त्याऐवजी राजर्षी शाहू-फुले-आंबेडकर व्यापारी संकुल, असे नव्याने नामांतरण केले. यावरून पाटील गटाचे शिक्षक सभासद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
वार्षिक सभा सन 2021-22 या कालावधीतील होती. या कालखंडात केलेला गैरकारभार हा संस्थेच्या सभासदांच्या पुढे उघड होईल, या कारणास्तव या विरोधी गटाने विषयानुसार चर्चा होऊ दिली नाही. त्यांनी जाणीवपूर्वक सभेत गोंधळ घातला आहे, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी असलेले नानासाहेब नरुटे यांनी दिली.
मागील वर्षी आम्ही जाणीवपूर्वक 9 टक्के लाभांश दिला. मात्र, सत्तेतील संचालक मंडळाने याचे श्रेय आम्हाला जाईल म्हणून तो तीन टक्क्यांनी कमी करून सहा टक्के दिला. म्हणजे 1014 सभासदांची प्रत्येकी 6000 प्रमाणे त्यांनी आताच लुटले आहेत, असा आरोप इंदापूर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी केला.