पिंपरी : लघुउद्योजकांसमोर समस्यांचा डोंगर | पुढारी

पिंपरी : लघुउद्योजकांसमोर समस्यांचा डोंगर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील लघुउद्योजकांसमोर विविध समस्यांचा डोंगर आहे. भोसरी एमआयडीसी, कुदळवाडी, तळवडे आदी भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एमआयडीसी परिसरात नोकरीनिमित्त येणार्‍या कामगारांना ये-जा करण्यासाठी पुरेशी वाहतूक सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, उद्योगांसाठी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा अभाव आदी समस्यांची जंत्री आहे. त्यामुळे लघुउद्योजक हैराण झाले आहेत. याबाबत एमआयडीसीने महावितरण, महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पीएमपीएमएल आदींची एकत्रित बैठक घ्यायला हवी, अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

वाहतूक सुविधा अपुरी
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. शहरात छोटे-मोठे 10 ते 15 हजार लघुउद्योग आहेत. या लघुउद्योगांचा विस्तार भोसरी, चिंचवड एमआयडीसी, तळवडे, चिखली, कुदळवाडी आदी परिसरात झालेला आहे. या लघुउद्योगांच्या परिसरात पीएमपीएमएल बसची सुविधा आहे. मात्र, बस सर्व परिसरातुन जाऊ शकतील, असे मार्ग सुरु नाहीत. त्यामुळे कामगारांना बसस्थानक गाठण्यासाठी बर्याचदा दीड ते तीन किलोमीटरचे अंतर पायी किंवा रिक्षाने जावे लागते. त्यानंतर त्यांना बस पकडून घर गाठावे लागते. त्यामध्ये विशेषत: महिला वर्गाची मोठी गैरसोय होते.

अंतर्गत रस्ते खराब
भोसरी एमआयडीसी, तळवडे, कुदळवाडी, चिखली आदी परिसरातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणारे कामगार, उद्योजक यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मोशी-तळवडे हा रस्ता देखील खराब झालेला आहे. तरी, या रस्त्यांची दुरुस्ती करुन गैरसोय दूर करावी, अशी मागणी कामगार, उद्योजक करीत आहेत.

विजेचा लपंडाव
प्राधिकरणातील पेठ क्रमांक 7 व 10 येथे दुरुस्तीच्या कारणास्तव वारंवार खंडित करण्यात येणार्या वीजपुरवठ्यामुळे येथील नागरिकांसह लघुउद्योजक देखील हैराण झाले आहेत. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा प्रश्न
लघुउद्योगांमध्ये तयार होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची मागणी बर्याच वर्षांपासून केली जात आहे. त्यावर वारंवार चर्चेचे गुर्हाळ झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही. सध्या या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. भोसरी एमआयडीसीमध्ये दीड एकर जागेत 1 दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

उद्योजकांना जाणवणार्या विविध समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी उद्योजकांकडून सूचना मागविणार आहे. त्यानंतर एमआयडीसी अधिकारी, उद्योजक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आदींसोबत अ‍ॅाक्टोंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये बैठक घेण्याचे नियोजन आहे.
– दीपक करंदीकर, उपाध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

उद्योगांना आणि उद्योजकांना जाणवणार्या विविध समस्यांबाबत वेळोवेळी समन्वय साधला जातो. जिल्हा उद्योग मित्र समिती अंतर्गत ही कार्यवाही केली जाते. उद्योजकांना जाणवणार्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यापुढील काळात जिल्हाधिकार्यांकडे बैठक घेण्यात येईल.
– सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक, पुणे विभाग.

भोसरी एमआयडीसी, तळवडे, चिखली, कुदळवाडी आदी परिसरातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. भोसरी एमआयडीसीमध्ये वारंवार खंडित वीजपुरवठ्याची समस्या जाणवते. सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा प्रस्ताव प्रलंबित आहे. अग्निशमन केंद्र व्हायला हवे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्या-त्या विषयाशी संबंधित संस्थांसोबत लघुउद्योजकांची एकत्र बैठक घेणे गरजेचे आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.

Back to top button