नारायणगाव : तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्या: आमदार अतुल बेनके यांची मागणी | पुढारी

नारायणगाव : तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्या: आमदार अतुल बेनके यांची मागणी

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जुन्नर तालुक्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तालुक्यातील पारुंडे, रानमळा, पिंपरी पेंढार, मंगरूळ, बेल्हे, आणे पठार, साकोरी, निमगाव सावा, पिंपळवंडी, खामुंडी, उंब्रज, वडगाव आनंद, चिंचोली काशीद, ओतूर, डिंगोरे तसेच आदिवासी व पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, टोमॅटो, बटाटे, ऊस तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ओढे, नाले यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात जाऊन शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. पाण्याबरोबर पिकेही वाहून गेली.

पावसाचे पाणी कांदा चाळीत शिरल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेसह घरे, शेतातील पिके, पाणंद रस्ते, साकव पूल, छोटे-मोठे रस्ते वाहून गेले आहेत; तर जनावरे मृत्युमुखी पडली आणि काही पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करून आपत्ती निवारण निधीतून निधी उपलब्ध करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली.

 

Back to top button