अतिक्रमणांनी घोटला ओढ्यांचा गळा! नर्‍हे परिसरातील चित्र | पुढारी

अतिक्रमणांनी घोटला ओढ्यांचा गळा! नर्‍हे परिसरातील चित्र

धायरी; पुढारी वृत्तसेवा: नर्‍हे गावाच्या परिसरातून लेंडी ओढा व पिराचा ओढा वाहत आहेत. मात्र, काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी या ओढ्यांवर अतिक्रमण केल्यामुळे पूरस्थिती निमार्ण होत आहे. यामुळे या ओढ्यांचा गळा घोटल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. काही ठिकाणी नाल्यांच्या पात्रात पाईप टाकून बांधकामे झाल्याने या त्यांचे पात्रच गायब झाले आहे. त्यामुळे येथे थोडा जरी पाऊस झाला तरी पूरस्थिती निर्माण होते. मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्यांलगतच्या सोसायट्यांच्या संरक्षण भिंतीच वाहून जाऊन पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. यामुळे दोन नागरिकांचा पाण्यात वाहून मृत्यूही झाला होता.

तसेच मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली होती. अनेक वाहने या पुरात वाहून गेली होती. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणुन या दोन्ही ओढ्यांचे सर्वेक्षण करून तातडीने नैसर्गिक प्रवाहास अडथळा ठरणारी अतिक्रमणे व बांधकामे त्वरित काढून टाकण्याची मागणी नागरिकांनी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यकालात केली होती.

तसेच जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा व पाटबंधारे विभाग, तहसीलदार यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली होती. ग्रामपंचायत प्रशासनाच्या काळात ओढ्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांना नोटीसही बजावण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, नर्‍हे परिसरातील बांधकाम नियंत्राचा विषय ‘पीएमआरडीए’च्या अखत्यारित असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

नर्‍हे परिसरातील ओढ्या, नाल्यांवर झालेली अतिक्रमणे व अवैध बांधकामांबाबत लवकरच सर्व माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

                                            -राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए

काही बांधकाम व्यावसायिकांनी ओढ्या, नाल्यांवर बांधकामे केली आहेत. जुन्या ओढ्याच्या प्रवाहामध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे एकदिवस जरी पाऊस पडला, तरी हे ओढे, नाले भरून वाहतात व रहिवासी भागामध्ये पाणी शिरते.

                                                  -सुशांत कुटे, माजी उपसरपंच, नर्‍हे

Back to top button