खडकवासला : युवकावर कोयत्याने हल्ला; चौघे जेरबंद | पुढारी

खडकवासला : युवकावर कोयत्याने हल्ला; चौघे जेरबंद

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला डोणजेजवळ एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणार्‍या चौघांना जेरबंद करण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे.  मुख्य हल्लेखोर ऋषीकेश तांबे (रा. गोळेवाडी, डोणजे) हा फरार झाला आहे. अविनाश सांबरे, महेश काळे, अनिल राजने व विकास थिटे अशी जेरबंद करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. सर्व जण सिंहगड भागातील राहणारे आहेत.

डोणजे येथील संजय महादेव बंडगर (वय 21) याच्यावर ऋषीकेश तांबे, महेश काळे, अविनाश सांबरे, विकास थिटे, अनिल रांजणे यांनी गुरुवारी (15) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डोणजेजवळील घेरा सिंहगड हद्दीतील शुभम पायगुडे यांच्या पोल्ट्रीसमोर कोयता, लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात संजय बंडगर हा गंभीर जखमी झाला. सर्व हल्लेखोर पसार झाले.

त्यांचा शोध घेण्यासाठी हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, संतोष भापकर, दीपक गायकवाड यांच्या पथकाने ठिकठिकाणी छापे घातले. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Back to top button