पिंपरी : ‘वेदांता-फॉक्सकॉन’ गेल्याने शहरातील लघुउद्योगांना फटका

Vedanta-Foxcon www.pudhari.news
Vedanta-Foxcon www.pudhari.news
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प सुरुवातीला तळेगाव एमआयडीसीमध्ये नियोजित होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 40 ते 50 हजार तरुणांना मिळू शकणार्‍या नव्या रोजगार संधीवर पाणी पडले आहे. तळेगावमध्ये हा प्रकल्प सुरू झाला असता तर पिंपरी-चिंचवडमधील इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स आणि डिसप्ले फॅब्रिकेशन क्षेत्रात काम करणार्‍या लघुउद्योगांना फायदा मिळणार होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने त्यांना त्याचा फटका बसला आहे.

वेदांता ग्रुप आणि तैवान येथील फॉक्सकॉन कंपनीचा हा संयुक्त प्रकल्प तळेगाव एमआयडीसीमध्ये नियोजित होता. गाड्यांसाठी वापरल्या जाणार्‍या सेमीकंडक्टर चीपची निर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. चिप आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन निर्मितीचा या प्रकल्पासाठी वेदांता ग्रुपने तळेगाव टप्पा-4 येथील जागाही निश्चित केली होती. बीएस-6 इंजिन असणार्‍या वाहनांमध्ये सेमीकंडक्टर चीप लागते. कार, मोबाईल, लॅपटॉप, डेटा सेंटर्स, टॅब्लेट, वॉशिंग मशीन, एटीएम, हॉस्पिटल मशीन आदींमध्ये ही सेमीकंडक्टर चीप लागते.

कुशल तरुणांच्या रोजगार संधीवर पाणी
तळेगाव, पिंपरी-चिंचवड, चाकण, पुणे आदी भागातील कुशल तरुणांना या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नवीन संधी मिळणार होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, आयटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड घेतलेले तरुण, डिस्प्ले फॅब्रिकेटरचे शिक्षण घेतलेले तरुण, वेल्डर, हेल्पर, फॅब्रिकेशन फीटर, शीटमेटल फीटर आदींना नोकरी मिळाली असती. या प्रकल्पामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 40 ते 50 तरुणांना रोजगाराची संधी मिळणे शक्य होते. मात्र, त्यावर आता पाणी पडले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.

अ‍ॅटो हबसाठी पूरक प्रकल्प
पिंपरी-चिंचवड परिसरात अ‍ॅटो हब विस्तारले आहे. त्यासाठी हा प्रकल्प पूरक ठरला असता. सेमी कंडक्टर चीप आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनच्या या प्रकल्पामुळे प्रकल्प पिंपरी-चिंचवडमधील इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स आणि डिसप्ले फॅब्रिकेशन क्षेत्रात काम करणार्या लघुउद्योगांना फायदा मिळणार होता. तसेच, या उद्योगाला पूरक अन्य व्यवसायांना देखील त्यामुळे संधीचे दालन खुले होणार होते. खासगी मालवाहतूक, साफसफाई, देखभाल-दुरुस्तीचे काम करणारे व्यावसायिक यांनाही त्याचा फायदा मिळाला असता. मात्र, या सर्वच बाबी आता अपूर्ण राहणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

तळेगाव एमआयडीसीमधील नियोजित वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला कसा गेला, याची माहिती राज्य व केंद्र सरकारने द्यावी. या प्रकल्पासाठी पूरक असणार्‍या पिंपरी-चिंचवड परिसरातील लघुउद्योगांना त्याचा फटका बसला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने त्याचा परिणाम अन्य नवीन कंपन्यांच्या प्रकल्पांवर व्हायला नको. शहरातील मोठ्या कंपन्यांचा विस्तार सध्या बंद आहे. भोसरी एमआयडीसीतील उद्योगांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
                           – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील तरुणांना या प्रकल्पामुळे रोजगाराची संधी मिळणार होती. मात्र, ही संधी हिरावली गेली आहे. लघुउद्योजकांची साखळी असते. विविध लघुउद्योग एकमेकांना पूरक असतात. हा प्रकल्प सुरू झाला असता तर पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना नवीन काम मिळाले असते. त्याशिवाय, टेम्पोचालक, रखवालदार, हेल्पर आदींनाही नवीन रोजगार संधी मिळाली असती. मात्र, हा प्रकल्प गुजरातला गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
                             – संजय सातव, संचालक, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news