शिरदाळे परिसरातील बटाटे सडले; शेतकरी सापडले आर्थिक संकटात | पुढारी

शिरदाळे परिसरातील बटाटे सडले; शेतकरी सापडले आर्थिक संकटात

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे परिसरात अगाप बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे, परंतु सडलेले बटाटे निघत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले शिरदाळे गाव बटाट्याचे आगार म्हणून ओळखले जाते. येथील शेतकरी 90 टक्के क्षेत्रावर बटाटा पीक घेतात. यामध्ये विविध वाणांचा समावेश असतो. परंतु यंदा बटाटा लागवडीपासून आता पीक अंतिम टप्प्यात आले असताना पावसाने अक्षरश: कहर केला आहे.

यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असल्याची भावना प्रगतशील शेतकरी बाबाजी चौधरी, केरभाऊ तांबे, राघू रणपिसे, निवृत्ती मिंडे, संभाजी सरडे, जगदीश रणपिसे, सुरेश तांबे, मारुती तांबे, कोंडीभाऊ तांबे, गोरक्ष तांबे, जयदीप चौधरी, हनुमंत तांबे, बाळासाहेब तांबे या शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

बटाटा लागवडीपासून सुरू असलेला पाऊस थांबतच नाही. इतर पिकेदेखील वाया गेली असून शासनाने त्याचे पंचनामे केले आहेत, परंतु अजून त्याचा मोबदला मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. तो मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू, असे सरपंच वंदना गणेश तांबे, उपसरपंच मयूर संभाजी सरडे, माजी सरपंच मनोज तांबे, गणेश तांबे, बिपीन चौधरी यांनी सांगितले.

बटाटा पीक हे मोठं भांडवल असलेलं पीक आहे. आमच्या शेतकर्‍यांचे वर्षभराचे अर्थकारण या पिकावर अवलंबून असते. शेतकरी कर्ज काढून बटाटा पीक घेत असतो, परंतु या वर्षी अतिप्रमाणात पाऊस झाल्याने या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शासनाने सहकारी सोसायट्यांचे 50 हजार रुपये नियमित खातेदारांना त्वरित मिळावे, जेणेकरून काही शेतकरी यावर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी करू शकतील.
                                                        – मयूर संभाजी सरडे,
                                                           उपसरपंच, शिरदाळे

Back to top button